
रेवती हिंगवे
कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ते म्हणजे त्याच्या टोळीतील काही गुंडांनी सामान्य नागरिकावर आधी किरकोळ कारणावरून गोळीबार केला, तर काही अंतरावर जात दहशद पसरवण्यासाठी अजून एका नागरिकावर कोयत्याने हल्ला केला. या प्रकणात पोलिसांनी आधीच स्पष्ट केले होते की, निलेश घायवळचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध यात अढळून आला तर त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर निलेश घायवळची चौकशी करताना पोलीसांच्या असं लक्षात आलं की तो लंडनला फरार झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. मकोका अंतर्गत गुन्हा ही आहे. असं असतानाही तो परदेशात कसा गेला हा प्रश्न चर्चीला जात आहे. त्यात आता त्याचं एक राजकीय कनेक्शन समोर येत आहे.
या राजकीय कनेक्शनचा फायदा घेत हा निलेश घायवळ देश सोडून पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे. त्याच्या मागे शिंदे सेनेच्या एका माजी मंत्र्याचं आणि विद्यमान आमदाराचं पाठबळ असल्याचं बोललं जात आहे. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असूनही त्याला पासपोर्ट आणि व्हिसा कसा काय मिळाला? हा सध्या कळीचा मुद्दा आहे. त्यावर पोलिसांच्या चौकशीत असं निष्पन्न झालं की निलेश घायवळने आपलं नाव घायवळ ऐवजी गायवळ असं केलं. शिवाय अहिल्यानगर मधला पत्ता टाकत “तत्काळ” पासपोर्टसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलं होतं. मात्र त्याच्या पोलीस व्हेरिफिकेशनसाठी संपर्क झाला नाही. त्यामुळे “NOT AVAILABLE” चा रिमार्क देत पुणे विभागीय कार्यालयात पुन्हा पाठवण्यात आलं.
नक्की वाचा - Pune News: एम. कॉम शिकलेला निलेश घायवाळ कसा बनला कुख्यात गुंड? कशी मिळवली एवढी संपत्ती?
अशा स्थितीत जर पोलीस व्हेरिफिकेशन झालंच नाही. जे पासपोर्टसाठी अनिवार्य आहे. ते न करताच पासपोर्ट आला कुठून? आडनाव बदलेले कागदपत्र आले कुठून? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा सगळा प्रकार कोणत्या राजकीय “वरदहस्त” असल्याशिवाय शक्य नाही असं अनेकांच ठाम मत आहे. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा आका “शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत. ते मंत्री ही राहीले आहेत.सध्या ते माजी मंत्री म्हणून वावरतात. शिवाय ते आपल्या आगळ्या वेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात.
इतकचं नाही तर हाच निलेश घायवाळ हा धाराशीव जिल्ह्यात असलेल्या पनवचक्की प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करत होता. त्या मागे हीयाच आमदार महाशयांचा वरदहस्त होता असं बोललं जात आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे “बूथवरच” मॅनेजमेंट देखील यांच्याच वरदहस्तेमुळे शक्य झालं होतं. या घायवाळचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा एक फोटोही व्हायरल झाला होता. याच घायवाळने इतकी संपत्ती कमवली की त्याने थेट परदेशात संपत्ती तयार केली. मुलाला लंडनला शिकायला पाठवलं. शिवाय तो ही आता तिथेच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या गुंडाला सहारा देणारा तो माजी मंत्री आणि विद्यमान आमदार कोण याची चर्चा पुण्यात रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world