
सूरज कसबे
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादिततर्फे (MSEDCL) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 16 सप्टेंबर 2025 रोजी देखभालीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या दिवशी दुपारी 2 ते 3 या वेळेत महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. महामार्गावरील कोन ब्रिजजवळ, 9.600 ते 9.700 किलोमीटरच्या दरम्यान 22 KV भातन अजिवली वाहिनीचे काम होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून, महाराष्ट्र राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी पर्यायी मार्ग सुचवणारी अधिसूचना जारी केली आहे. वाहन चालकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही पर्यायी मार्ग सुद्धा सुचविण्यात आले आहे.
कोणते आहेत पर्यायी मार्ग ?
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी:
- सर्व प्रकारची वाहने कळंबोली सर्कल, जेएनपीटी रोड डी पॉइंट पळस्पे येथून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरून पुढे जाऊ शकतात.
- वाहने 8.200 किमी (शेंडूग एक्झिट) येथून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरून मार्गस्थ होऊ शकतात.
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी:
- सर्व प्रकारची वाहने 39.100 किमी (खोपोली एक्झिट) येथून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरून पुढे जाऊ शकतात.
- वाहने 32.600 किमी (खालापुर टोल नाका एक्झिट) येथून पाली ब्रीज मार्गे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरून मार्गस्थ होऊ शकतात.
वरील पर्यायी मार्गांचा वापर करून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरून प्रवास करणारी वाहने खालापुर टोल नाका आणि मॅजिक पॉइंट येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावर प्रवेश करू शकतात. हे काम पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक अधिसूचना अंमलात राहील. अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान दुपारी 3 नंतर काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहे.
दरम्यान आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणाकरिता 16 सप्टेंबर 2025 रोजी ब्लास्टिंग करण्यात येणार. त्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत वाहतूक बंद राहणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world