सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात एकाच दिवशी 7 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील आझाद चौकात लागलेल्या एकाच फलकावर या पाचही मृतांची नावे झळकल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या एकाच दिवशी घडलेल्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत्यूचे नक्की कारण काय? यावरून परिसरात सध्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. फुगेवाडी भागात दोन ठिकाणी अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याच अवैध दारूमुळे या नागरिकांचा बळी गेल्याची चर्चा दबक्या आवाजात संपूर्ण परिसरात सुरू आहे.
पोलिसांचा प्राथमिक तपास आणि खुलासा
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून प्राथमिक माहिती समोर आणली आहे. पोलिसांच्या मते, हे पाचही मृत्यू एकाच कारणामुळे झालेले नसून त्या स्वतंत्र घटना आहेत. 57 वर्षांच्या पांडुरंग फुगे यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर 31 वर्षीय विजय राठोड आणि 34 वर्षीय राजेंद्र राठोड या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इतर मृतांच्या बाबतीत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 51 वर्षांच्या राजेंद्र राजपूत यांचा बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. तर 52 वर्षीय अकबर पठाण यांना गेल्या 15 वर्षांपासून दारूचे व्यसन होते. पाचपैकी चार मृतांना दारूचे कोणतेही व्यसन नव्हते आणि त्यांच्या नातेवाईकांनीही हातभट्टीची दारू पिल्याची कोणतीही तक्रार केलेली नाही, असा दावा दापोडी पोलिसांनी केला आहे.
( नक्की वाचा : Buldhana News : बाप-भावावर हत्येचा डाग, पण मुलगी जिवंत परतली! पोलिसांच्या अजब तपासाची धक्कादायक कहाणी )
शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष
स्थानिक नागरिक अँड. सतीश कांबिये यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली असून अवैध धंद्यांकडे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे, दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे की, प्राथमिक तपास वेगळा असला तरी या सर्व प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सर्व मृतांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world