Pune News : मराठी साहित्यातील ज्येष्ठ प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेता ग दि माडगूळकर यांचं घर पाडण्यासाठी डाव आखला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग दि माडगूळकर यांची 'पंचवटी' पाडण्यास त्यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी विरोध केला आहे. जवळच्या नातेवाईकांकडून त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप सुमित्र यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी धक्कादायक दावा केला आहे.
ग दि माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ग दि माडगूळकरांचे पुण्यातील शिवाजीनगरमधील पंचवटी निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्याने नातेवाईकच त्रास देत आहेत. जवळचे नातेवाईक आणि आजूबाजूच्यांना ही वास्तू पाडून बिल्डरला द्यायची आहे आणि त्यात पैसे उकळायचे आहे. याला आमचा विरोध आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वास्तूमध्ये गदिमा यांचं वास्तव्य होतं. ही वास्तु तशीच राहावी अशी आमची इच्छा आहे, असं सुमित्र माडगूळकर यांनी सांगितल आहे. मी हे घर पाडायला विरोध करीत असल्यामुळे मला धमक्या येत आहे. माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे, असाही दावा सुमित्र माडगूळकर यांनी केला आहे.
'या' निवासस्थानात रचलं गीत रामायण...
ज्येष्ठ साहित्यिक लेखक गदिमा माडगूळकर यांचे पुण्यात पंचवटी नावाचे निवासस्थान आहे. याच निवासस्थानात बसून त्यांनी गीत रामायण लिहिलं होतं. गदिमांचे नातू सुमित्र मांडगुळकर यांनी पोस्ट करत ही वास्तू पाडू किंवा विकू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने धमकी येत असल्याची माहिती दिली आहे.