अविनाश पवार
पुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला शनिवारवाडा सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या आवारात मुस्लिम महिला नमाज अदा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओनंतर शहरातील वातावरण अचानक तापले. पतीत पावन संघटना तसेच इतर हिंदू संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. एकीकडे हे आंदोलन होत असताना दुसरीकडे बुद्धीजीव वर्गाकडून या कृत्याचा निषेध ही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी पुण्यात ऐन दिवाळीत अनुभवायला भेटत आहेत.
शनिवारवाड्यासमोरील दर्ग्याच्या उपस्थितीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आंदोलकांच्या मते, हा ऐतिहासिक ठेवा हा पुण्याच्या वारशाचा भाग आहे. येथे धार्मिक कृती घडवून आणणे योग्य नाही. दुसरीकडे, काही गटांचा दावा आहे की या गोष्टींना राजकीय रंग देण्यात येत असून, धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मेधा कुलकर्णींचा या निमित्ताने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी जोरदार निषेध व्यक्त केला आहे. शिवाय त्यांना अटक झाली पाहीजे अशी मागणी ही त्यांनी लावून धरली आहे.
नक्की वाचा - मुघलांच्या काळात कशी साजरी व्हायची दिवाळी? 'जश्न-ए-चिरागां'च्या नावाखाली काय व्हायचं?
या प्रकरणात महायुतीतसुद्धा अंतर्गत कलगीतुरा रंगताना दिसत आहे. शनिवारवाड्यावरील आंदोलनानंतर आज पुन्हा एकदा रूपाली ठोंबरे या आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे दाखल झाल्या. त्यांनी ही तिथे आंदोलन केले. त्यांच्या या कृतीमुळे परिस्थिती आणखीनच तापली आहे. पोलिसांनी शनिवारवाडा परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. संवेदनशीलता लक्षात घेऊन अतिरिक्त फोर्स तैनात केला आहे. तर भाजप खासदार मेधा कुलकर्णी या टीक होवून ही आपल्या भूमीकेवर ठाम आहेत. तर पुण्यातील नागरिकांमध्ये याबाबत दोन मतं उमटताना दिसत आहेत. काहींना वाटते की धार्मिक ठिकाणी राजकारणाची पावले पडू नयेत. तर काहीजण म्हणतात की ऐतिहासिक वारशाचे रक्षण व्हावे म्हणून प्रश्न विचारणे आवश्यक आहे असं ही म्हणत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट, व्हिडिओ आणि प्रतिक्रिया यांचा पूर आला आहे. राजकीय पक्षांकडूनही या प्रसंगाचा वापर करून आपापली भूमिका मांडली जात आहे. या वादातून कोणाची राजकीय पोळी भाजून घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी शनिवारवाडा हा केवळ ऐतिहासिक पर्यटनस्थळ न राहता, राजकीय आणि धार्मिक चर्चेचे केंद्र बनला आहे. पुढील काही दिवसांत येथे असलेल्या वास्तू आणि धार्मिक रचनेसंदर्भात नवीन वाद निर्माण झाले, तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही राहिलेले नाही. पुण्याच्या मध्यभागी असणारा हा वारसा स्थळ आता सत्तेच्या आणि मतांच्या समीकरणात गुंतताना दिसत आहे.