
देवा राखुंडे
'आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे' अशी धमकी देणारा व्हिडीओ एका तरुणाने बनवला. त्यातून दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. हा व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला. पण त्याचा माज इथेच थांबला नाही. तर त्याने त्या व्हिडीओला 'सरकार नो कॉम्प्रोमाइज ' असे कॅप्शन टाकले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा पसरला. तो इतका पसरला की थेट पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत तो गेला. खुले आम सरकार आणि पोलीसांनाच या व्हिडीओच्या माध्यमातून आव्हान देण्याचा हा प्रकार होता. ते ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात होत असल्याने पोलीसांनीही तातडीने कारवाई केली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ टाकणाऱ्या एका तरुणावर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत अर्जून घुले असं या तरुणाचे नाव आहे. त्याचे 25 वर्षे आहे. तो बारामतीच्या ढेकळवाडीचा रहिवाशी आहे. त्याने 18 ऑक्टोबरला त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडी जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शिवाय तो व्हिडीओ ही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे लोकांमध्ये ही त्यातून दहशत निर्माण झाली होती. शेवटी त्याची तक्रीर पोलीसात करावी लागली.
नक्की वाचा - मुघलांच्या काळात कशी साजरी व्हायची दिवाळी? 'जश्न-ए-चिरागां'च्या नावाखाली काय व्हायचं?
समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील आणि पोलिस कॉन्स्टेबल राजू बन्ने यांनी या व्हिडिओची खातरजमा केली. पुढे बन्ने यांच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत कायद्याचा बडगा उगारला आहे. श्रीकांत घुले याच्यावर बीएनएस कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर 'दादागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याने बारामती तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस जवान राजेश बन्ने यांनी सदरची कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास किशोर वीर हे करत आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोणत्याही गावात तसेच एमआयडीसी, सूर्यनगरी परिसरात कोण दादागिरी, दहशत करत असेल तर 9923630652 या क्रमांकावर कळवा असे आवाहन करण्यात येत आहे. त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं बारामती तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world