शहराची नावं अलीकडच्या काळात बदलली गेली. शिवाय काही रेल्वे स्थानकांनाही नवीन नावं देण्यात आली. त्यामुळे कधी कोणत्या शहराच तर कधी कोणत्या रेल्वे स्थानकाचं नाव बदललं जावं अशा मागण्या होवू घातल्या आहेत. त्यात आता पुणे रेल्वे स्थानकाचे नावही बदलले जावे अशी मागणी केली जात आहे. पुणे रेल्वे स्थानकाला ‘बाजीराव पेशवे' यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक वारसा आणि पेशव्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे. "बाजीराव पेशवे हे केवळ मराठ्यांचे नाही तर अखिल भारतीय इतिहासातील एक महान सेनानी आणि रणनीतीकार होते असं त्या म्हणाल्या. त्यांचं पुण्याशी असलेलं अतूट नातं लक्षात घेता, पुणे रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव देणं हे ऐतिहासिक न्याय देणं ठरेल. असं ही त्यांनी या निमित्ताने सांगितलं. या मागणीनंतर विविध राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे. काहींनी नाव बदलण्याऐवजी स्थानकाच्या सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
मेधा कुलकर्णी यांनी जरी ही मागणी केली असली तरी रेल्वे प्रशासन किंवा राज्य सरकारने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ही मागणी पुढील काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज सोमवारी पुण्यात पार पडली. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. यावेळी पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधीत प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी या बैठकीत उपस्थित केले. त्यावेळी त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली.
भारतात कुठल्या ही ठिकाणाचा त्यांच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे हा त्या मागचा उद्देश असतो. परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे. नावाजलेले आहे. राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसेच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केले आहे. या कामात बाजीराव पेशवे यांची देखील योगदान मोठे आहे. थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले. त्यातील एकही ते हरले नाही. त्यांचे इतिहासातील योगदान पाहाता बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी कुलकरणी यांनी लावून धरली आहे.