Pune News : हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याशिवाय खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एमआयडीसीला दरमहा १५ टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पुणेकरांना आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांसोबतच पाणीटंचाईचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे मॉन्सून कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनुसार, भविष्यात अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झाल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत.
कुठल्या धरणात किती पाणीसाठा
- खडकवासला: ४३ टक्के
- पानशेत: ५६ टक्के
- वरसगाव: ४६ टक्के
- टेमघर: ११.८८ टक्के
- एकूण पाणीसाठा: ४५ टक्के
पुण्यात उन्हाचा कडाका वाढला, पारा चाळीशी पार
पुण्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा कडाका वाढला आहे. पारा चाळीशी पार गेला असून कडक उन्हातही शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी डोक्याला स्कार्फ बांधून, टोपी घालून, सनकोट परिधान करत भर उन्हात शेतकरी महिलांकडून शेतात खुरपणी केली जात आहे. उष्माघातापासून बचावासाठी, शेतकऱ्यांकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. उन्हापासून स्वतःचे संरक्षण करून शेतातील कामं केली जात आहेत. गेल्या पाच-सहा दिवसापासून वाढलेल्या उन्हाच्या कडाक्याचा परिणाम हा शेतकऱ्यांवरती सुद्धा झालेला पाहायला मिळतोय. उन्हापासून संरक्षणासाठी विविध उपाययोजना करून भर उन्हात बळीराजाला शेतीची कामे उरकावी लागत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world