Pune News: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला मोठा वेग आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 62 टक्क्यांहून अधिक जमिनीसाठी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. गेल्या 15 दिवसांत, या प्रकल्पात बाधित होणाऱ्या 7 गावांमधील 1,600 शेतकऱ्यांनी 1,750 एकर क्षेत्रासाठी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहेत. मुंजवडी गावातील सुमारे 90 टक्के शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
पूर्वीच्या अधिसूचनेनुसार, या विमानतळासाठी 2,673 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. मात्र, आता त्यात 1,388 हेक्टरची कपात करून हे क्षेत्र 1,285 हेक्टर करण्यात आले आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा दिलासा मिळाला आहे. एकूण तीन हजार एकर जागेचे भूसंपादन करणे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी 1,750 एकर क्षेत्राला आतापर्यंत मान्यता मिळाली आहे.
(नक्की वाचा- Pune News: ठिकठिकाणी वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण, ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजेचा दणदणाट)
18 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत
विमानतळासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, आणि खानवडी या 7 गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने 26 ऑगस्टपासून संमतीपत्र स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मुंजवडी गावात 76 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून, त्यापैकी 70 हेक्टर क्षेत्रासाठी संमतीपत्रे शेतकऱ्यांनी सादर केली आहेत.
(नक्की वाचा- USA Tragedy: डंकीने अमेरिकेत गेला, नोकरी मिळवली, पैसे कमवले, पण शेवट असा भयंकर की, घरचे म्हणतात...)
शेतकऱ्यांना संमतीपत्रे सादर करण्यासाठी 18 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्रशासनाला विश्वास आहे की उर्वरित शेतकरीही या मुदतीत आपली संमती देतील. कमी क्षेत्रात भूसंपादन करण्याचा निर्णय आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या चांगल्या मोबदल्यामुळे हा प्रकल्प पुढे सरकण्यास मदत होत आहे.