- दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात पहाटेच्या सुमारास दरोड्याची घटना घडली आहे
- पुणे सोलापूर महामार्गावर देव दर्शनानंतर परत येणाऱ्या कुटुंबावर आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून हल्ला केला
- आरोपींनी कारच्या चालक बाजूची काच फोडून मारहाण केली आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेतले
देवा राखुंडे
दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात पहाटेच्या सुमारास थरारक दरोड्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वच जण हादरून गेले आहेत. पुणे सोलापूर महामार्गावर हा प्रकरा घडला. देव दर्शन करून एक कुटुंब परत पुण्याला येत होते. त्यावेळी काही क्षण विश्रांती करावी म्हणून पहाटेच्या सुमारात रस्त्याच्या कडेला त्यांनी त्याची कार उभी केली. कारमध्ये त्यावेळी सर्व जण झोपले असताना तीन अज्ञात इसमांनी अचानक हल्ला केला. बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्याकडून तब्बल एक लाख 75 हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी तीन अज्ञातांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महामार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्याचं ही समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप सुखदेव धोत्रे हे आपल्या कुटुंबीयांसह देवदर्शनला गेले होते. देवदर्शन करून ते पुण्याकडे परतत होते. त्यावेळी पहाटेचे तीन वाजले होते. त्यामुळे काही वेळ विश्रांती घ्यावी असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी ते कुरकुंभ गावच्या हद्दीत विश्रांतीसाठी थांबले होते. पुढे काय होणार आहे याची पुसटती कल्पनाही त्यांनी आली नाही. ते निवांत कारमध्ये आपल्या कुटुंबियांसह झोपले होते.
त्याच वेळी तीन अज्ञात आरोपी तिथे आले. आरोपींनी कारच्या चालक बाजूची काच लोखंडी रॉडने फोडली. त्यानंतर कारमध्ये बसलेल्यांना मारहाण केली. या हल्ल्यात प्रदीप धोत्रे, त्यांचे मावस भाऊ मयूर काकडे आणि मावशी सपना काकडे जखमी झाले. यानंतर आरोपींनी बंदुकीचा धाक या सर्वांना दाखवला. शिवाय सपना काकडे यांच्या अंगावरील मंगळसूत्र, गंठण व कानातील सोन्याचे दागिने मागितले. त्यांनी ही भिती पोटी सर्व दागिने त्यांना दिले. त्यानंतर हे आज्ञात हल्लेखोर तिथून पसार झाले. या धक्क्यातून या कुटुंबाने स्वत:ला सावरले.
दरोडेखोनाने जवळपास 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. ते हा ऐवज घेवून मोटारसायकल वरून पळून गेले. घटनेनंतर याची माहिती कुरकुंभ पोलीसांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाय तपास ही सुरू केला आहे. आरोपींचा शोधून काढण्याचं आव्हान आता पोलिसां समोर आहे. पुणे सोलापूर महामार्गावर या आधी ही अशा घटना घडल्या आहेत. काही टोळ्या इथं सक्रीय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांचा लवकर बदोबस्त करण्याची जबाबदारी आता पोलीसांची आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण आहे.