- कॅनडाच्या एडमॉन्टनमधील ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये ४४ वर्षीय प्रशांत श्रीकुमार यांचा मृत्यू झाला
- प्रशांत यांना छातीत वेदना होताच रुग्णालयात दाखल केले पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना फक्त टायलेनॉल दिले
- प्रशांत यांच्या पत्नी निहारिकाने रुग्णालयावर वेळेवर उपचार न केल्याचा आरोप केला
कॅनडातील एडमॉन्टन शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तब्बल 8 तास वाट पाहावी लागल्याने 44 वर्षीय प्रशांत श्रीकुमार या भारतीय वंशाच्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवाय प्रशांत यांच्या कुटुंबीयांनी ही हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणानंतर कॅनडामध्ये राहाणाऱ्या भारतीयांत असंतोषाचे वातावरण आहे.
प्रशांत यांना 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. 12.20 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री 8.50 वाजेपर्यंत त्यांना केवळ 'ट्राइएज'मध्ये बसवून ठेवण्यात आले. यावेळी त्यांचा रक्तदाब 210 पर्यंत पोहोचला होता. तरीही त्यांना केवळ 'टायलेनॉल' देऊन प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. यावेळी प्रशांत यांचे कुटुंबीय त्यांना उपचाराची गरज आहे असं सांगत होते. पण रुग्णालय प्रशासन हवा तसा प्रतिसाद देत नव्हता असं ही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
प्रशांत यांच्या पत्नी निहारिका यांनी रडत रडत रुग्णालयावर खुनाचा आरोप केला आहे. "माझ्या पतीला वेळेवर उपचार न देऊन रुग्णालयाने त्यांची हत्या केली आहे. मी मदतीसाठी विनवणी करत असताना तिथल्या कर्मचाऱ्यांनी मदतीऐवजी माझे वागणे उद्धट असल्याचे सांगितले," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. प्रशांत यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. प्रशांत यांच्या मृत्यूने हे कुटुंबचं पोरकं झालं आहे. घरचा आधार अचानक गेला आहे. कमी वयात केवळ रुग्णालयाच्या एका चुकीमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. साता समुद्रापार हा मृत्यू आल्याने त्यांचे भारतातील कुटुंबीय ही हादरले आहेत.
प्रशांत यांचे वडील कुमार श्रीकुमार यांनी आपल्या मुलाच्या शेवटच्या क्षणी काय झालं तो अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. प्रशांतने कर्मचाऱ्यांना आपल्या वेदना 10 पैकी 15 असल्याचे सांगितले होते. ईसीजी केल्यावर सर्व सामान्य असल्याचे सांगून त्यांना ताटकळत ठेवले गेले. "पप्पा, आता वेदना सहन होत नाहीत," हे प्रशांतचे शेवटचे शब्द ठरले. शेवटी वॉर्डमध्ये नेतानाच ते कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली असं त्यांच्या वडीलांनी सांगितलं. एकीकडे पती डोळ्यादेखत जात असताना निहारिका मदतीसाठी ओरडत होत्या, मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांची बाजू समजून घेण्याऐवजी त्यांच्याशी गैरवर्तन केले.
44 year-old man passes away in the hospital after waiting over 8 hours in the emergency room in Canadian hospital 😳💔 pic.twitter.com/bHztPMbDkH
— RTN (@RTNToronto) December 25, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world