Pune News : '200 श्रीमंत पोरांना आधीच पळवले', पुण्यातील 'त्या' पार्टीबाबत रोहित पवारांचा गंभीर आरोप

Pune News : पुण्याजवळील तुळापूर येथे झालेल्या हायप्रोफाईल मद्य पार्टी प्रकरणात रोहित पवारांनी गंभीर आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

Pune News : पुण्याजवळील तुळापूर येथे झालेल्या हायप्रोफाईल मद्य पार्टी प्रकरणात धनदांडग्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने संगनमत केल्याचा अत्यंत गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दोनशे लोकांची गर्दी असताना केवळ एकोणतीस लोकांचेच जबाब का नोंदवले, असा थेट सवाल करत रोहित पवार यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सचिव एन. रामस्वामी यांना मंत्रालयात धारेवर धरले. 

पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता तुळापूरच्या या मद्य पार्टीत बड्या घरच्या आरोपींना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आल्याने रोहित पवार आक्रमक झाले असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

काय म्हणाले रोहित पवार?

आमदार रोहित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईवर अत्यंत जळजळीत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सचिवांशी झालेल्या भेटीत सांगितले की, तुळापूर येथील पार्टीवर जेव्हा छापा टाकण्यात आला, तेव्हा तिथे सुमारे 200 तरुण-तरुणी उपस्थित होते. असे असताना उत्पादन शुल्क विभागाने केवळ 29 जणांचेच जबाब का नोंदवले? 

उरलेल्या लोकांना मागच्या दाराने पळून जाण्यास कोणी मदत केली, असा थेट सवाल त्यांनी केला आहे. हा सर्व प्रकार धनदांडग्यांच्या आणि वजनदार लोकांच्या मुलांना कायदेशीर कारवाईतून वाचवण्यासाठीच केला गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

( नक्की वाचा : Chhagan Bhujbal: नाराज भुजबळ राष्ट्रवादीला 'जय महाराष्ट्र' करणार? समर्थकांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत )

स्थानिक पोलिसांना अंधारात का ठेवले?

या संपूर्ण मद्य पार्टी प्रकरणातील सर्वात संशयास्पद बाब म्हणजे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील ताळमेळ नसणे. रोहित पवार म्हणाले की, जर या दारू पार्टीला प्रशासनाची अधिकृत परवानगी होती, तर स्थानिक पोलिसांना त्याची पूर्वकल्पना का देण्यात आली नव्हती? नियमानुसार अशा मोठ्या पार्ट्यांवर छापा टाकताना किंवा कारवाई करताना स्थानिक पोलिसांची मदत घेणे कायदेशीररित्या बंधनकारक असते. 

मात्र, या कारवाईत पोलीस कुठेच दिसले नाहीत. हा प्रशासकीय गोंधळ आहे की जाणीवपूर्वक पोलिसांना दूर ठेवून आरोपींना पळवून लावण्याचा डाव होता, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, सोमवारपासून लागू होणार नवे वेळापत्रक, 'या' गोष्टींवर निर्बंध! )

रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा

तपासाच्या पद्धतीवर बोट ठेवताना रोहित पवार यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक मद्यधुंद अवस्थेत असताना केवळ निवडक आणि मोजक्याच लोकांचे रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल्स) तपासणीसाठी घेण्यात आले. ही तपासाची दिशा जाणीवपूर्वक भरकटवण्याचा प्रकार असून, भविष्यात न्यायालयात हा खटला कमकुवत व्हावा यासाठीच पुराव्यांशी छेडछाड केली जात असल्याचे त्यांनी म्हटले. ठराविक बड्या घरच्या मुलांना वाचवण्यासाठी कायद्याची थट्टा उडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार यांनी या प्रकरणी थेट राज्य सरकार आणि उत्पादन शुल्क मंत्र्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले की, मंत्री म्हणून तुम्हाला आता केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही, तर थेट ॲक्शन घ्यावीच लागेल. केवळ कारवाईचे नाटक करून जनतेची दिशाभूल करू नका. 

Advertisement

ज्या जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवला किंवा आरोपींना पळून जाण्यास मदत केली, त्यांच्यावर तात्काळ कठोर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे सरकारने सिद्ध करावे, अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
 

Topics mentioned in this article