पुणे विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. असा आरोप शेकडो विद्यार्थ्यांनी केला आहे. या निषेधार्थ आज विद्यापीठात आंदोलनासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले होते. निकालातील चुका, ग्रेस मार्कमध्ये अनियमितता आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. आज सकाळपासूनच विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ गेटवर जोरदार घोषणाबाजी केली.
घोषणाबाजी दरम्यान आंदोलन करणारे विद्यार्थी अचानक आक्रमक झाले. त्यातील काही विद्यार्थी गेट तोडून विद्यापीठाच्या आत घुसले. यावेळी विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले. विद्यार्थीय विद्यापीठाच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात नाराज होते. त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हे सर्व विद्यार्थी जमा झाले होते.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सांगितले की, नियमाप्रमाणे एकूण मार्कांच्या दहा टक्के ग्रेस देण्याचा नियम आहे. त्यानुसार 50 मार्कांच्या पेपरसाठी फक्त 5 मार्क ग्रेस मिळायला हवे, परंतु एका विद्यार्थिनीला 9 मार्क्स असताना थेट 20 मार्क देऊन पास करण्यात आले आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अशा अनेक निकालांमध्ये घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कामावरच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
नक्की वाचा - Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...
या सर्व घडामोडींवर विद्यार्थ्यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्यात त्यांनी निकाल प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी केली आहे. या शिवाय चुकीचे निकाल दुरुस्त करावेत. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घ्यावी त्याच बरोबर 'कॅरी ऑन'ची सुविधा देण्याची मागणी ही विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. लवकरच विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.