
Indian nurse Nimisha Priya on death row in Yemen: येमेनमधील केरळची नर्स निमिषा प्रिया हिला फाशी पासून वाचवण्याची शेवटची आशाही आता जवळपास संपुष्टात आली आहे. निमिषाला 16 जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे. तिला वाचवण्यासाठी केरळपासून दिल्लीपर्यंत, शेवटचे प्रयत्न केले जात होते. मात्र त्या प्रयत्नांनाही बुधवारी धक्का बसला. या प्रकरणात तिला वाचवण्याचे आशेचे शेवटचे किरण ही मावळले आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, निमिषा प्रियाची फाशी थांबवण्यासाठी सरकार यापुढे काहीही करू शकत नाही. त्यामुळे आता तिला फाशी होणार हे निश्चित झाले आहे.
सरकारने सर्वोच्च न्यायालयाला काय सांगितले?
केंद्र सरकारने सोमवारी सांगितले की, 'हे दुर्दैवी आहे, पण आम्ही काय करू शकतो. याला एक मर्यादा आहे.' सरकारने असेही म्हटले की, निमिषाला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पीडित कुटुंबाने येमेनी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याने 'ब्लड मनी' म्हणजेच आर्थिक भरपाई स्वीकारण्यास सहमती दर्शवणे हा आहे. तसे झाले तरच ती वाचू शकते. अटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, हा एक अतिशय गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ब्लड मनी घ्यायचे की नाही हा पुर्ण पणे खाजगी गोष्ट आहे. यात भारत सरकार जास्त काही करू शकत नाही. आम्ही जे काही शक्य होते, ते सर्व प्रयत्न केले. आम्ही या प्रकरणात निमिषाला वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले. पण दुर्दैवाने आम्ही तिला वाचवू शकत नाही हेच सत्य आहे. त्यात एक सरकार काय करू शकते याला ही एक मर्यादा असते असं ही ते यावेळी म्हणाले.
रक्कम देण्याचीही तयारी
यावेळी न्यायाधीशांनी विचारले की, सरकार कुटुंबाने जमा केलेल्या ब्लड मनीवर येमेनशी बोलण्याचा प्रयत्न करू शकते का? यावर केंद्र सरकारने उत्तर दिले की, हे त्यांच्या हातात नाही. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले, 'रियाधमधील दूतावास हे प्रकरण हाताळत आहे. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की, सरकारमधून कोणीतरी जाऊन कुटुंबाशी ब्लड मनी स्वीकारण्याबद्दल बोलेल. आम्ही अधिक रक्कम देण्यासही तयार आहोत. असंही त्यांनी कोर्टात सांगितलं.
कोण आहे निमिषा प्रिया?
केरळमधून आलेली निमिषा प्रिया नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये यमनला गेली होती. ती आपल्या आई-वडिलांना चांगले आयुष्य देण्यासाठी तेथे गेली होती असे सांगितले जाते, कारण तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सुरुवातीला तिने यमनमधील अनेक रुग्णालयांमध्ये दिवसरात्र काम केले. त्यानंतर तिने स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती 2014 मध्ये तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली. तलालने निमिषाला यमनमध्ये क्लिनिक सुरू करण्यास मदत करण्याचे वचन दिले. निमिषाला वाटले की आता तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. निमिषाने कायद्यांनुसारच क्लिनिक उघडण्यासाठी भागीदारी केली आणि अटी मान्य केल्या. निमिषाने 2015 मध्ये महदीसोबत तिचे क्लिनिक सुरू केले. पण लवकरच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले.
नक्की वाचा - Nanded News : भाजप आमदाराची जिल्हा उपनिबंधकाला शिवीगाळ करत धमकी; काय आहे प्रकरण?
येमेनमध्ये निमिषासोबत काय घडले?
पलक्कड जिल्ह्यातील कोल्लेंगोडे येथील रहिवासी असलेल्या निमिषा प्रियाला 2020 मध्ये येमेनमधील एका व्यक्तीच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले होते. तो तिचा व्यावसायिक भागीदार होता. ही घटना जुलै 2017 मध्ये घडली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने तिचे अपील फेटाळून लावले होते. त्यानंतर तिला 16 जुलै रोजी फाशी द्यावी असे आदेश ही दिले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world