जाहिरात

विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांची 'लूट'; पालखी मार्गावर सतर्क राहण्याचं पोलिसांचं आवाहन

लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने न्हाऊन निघालेल्या पालखी सोहळ्याला यंदा चोरांनी लक्ष्य केल्याचं समोर आलं आहे.

विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांची 'लूट'; पालखी मार्गावर सतर्क राहण्याचं पोलिसांचं आवाहन

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने न्हाऊन निघालेल्या पालखी सोहळ्याला यंदा चोरांनी लक्ष्य केल्याचं समोर आलं आहे. सोहळ्यातील गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेक भाविकांचे दागिने आणि मोबाइल चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी तत्परता दाखवत वेगवेगळ्या कारवाईत तिघांना रंगेहाथ अटक केली असून एका महिलेलाही ताब्यात घेतलं आहे.

हडपसरमध्ये ८९ ग्रॅम सोन्याची चोरी

पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत हडपसर परिसरात चोरट्यांनी मोठा हात मारला. येथे तब्बल १० महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्या या दागिन्यांचे एकूण वजन सुमारे ८९ ग्रॅम असून त्याची किंमत ३ लाख ५६ हजार रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरांचा शोध सुरू आहे. दुसरी घटना भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात घडली. येथे दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचे १ लाख १० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत लीलावती शिंदे हिला ताब्यात घेतलं आहे. तसेच, लोकमान्य नगर भागातही एका महिलेचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोराने लंपास केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयफोन चोरणारे तिघे जेरबंद

सोलापूर रस्त्यावरील शंकर मठाजवळ दर्शनादरम्यान एका भाविकाचा महागडा आयफोन चोरण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी संशयितांचा पाठलाग केला आणि तिघा आरोपींना रंगेहाथ पकडले. दरम्यान यामध्ये तेजस गुंजाळ, टिपेंद्र म्हेत्रे आणि शिवदर्शन महतो यांना अटक करण्यात आली आहे. पालखी बंदोबस्तादरम्यान गुन्हे शाखेने ७९ महिला आणि २० पुरुष अशा एकूण ९९ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. 

दरम्यान पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी, विशेषतः महिलांनी आपले दागिने, मोबाईल आणि पाकीट सांभाळावे व सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com