राहुल कुलकर्णी, पुणे
पुण्यात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही पर्यटकांचे पाय पर्यटनस्थळी वळत आहेत. त्यामुळेच पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खंडाळ्याजवळ सकाळी लांबच-लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. सलग दोन सुट्ट्यांमुळे नागरिकांची पावलं पर्यटनस्थळांवर वळत आहेत. त्यामुळेच पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दिशेने तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा दिसत होत्या. त्यामुळे एक लेन वाहतूक पोलिसांनी थांबवली.
पुण्यातील अनेक पर्यटनस्थळावर पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या 8 तालुक्यांतील गड- किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा पर्यटनस्थळी आता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या तालुक्यातील पर्यटनाच्या ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे.
धोकादायक पर्यटनामुळे अपघात होण्याच्या प्रकारांत वाढ होऊन त्यात काहींना जीव गमवावा लागण्याच्या घटना दर वर्षी घडतात. यंदाही पाऊस सुरू होताच दोन दिवसांत दोन दुर्दैवी घटना घडल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी जमावबंदीचे आदेश जारी केले.
नेमका आदेश काय ?
वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे, खोल पाण्यात पोहणे यांवर बंदी, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यापान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 31 जुलैपर्यंत लागू असतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world