- पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट भेटण्यास नकार दिला होता
- मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या नुकसानीसंबंधी तक्रारी ऐकण्याऐवजी त्यांची थट्टा केली
- खडकवासल्या पाण्यासाठी आंदोलनादरम्यान मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन विसरल्याचा आरोप
देवा राखुंडे
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मंत्री भरणे यांनी थट्टा केली आहे का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. खडकवासल्याच्या पाण्या वाचून मोठ्या प्रमाणात ऊसाचे नुकसान झाले आहे. या ऊसाचे पंचनामे करण्यासाठी एका शेतकऱ्याने मंत्री भरणे यांना भेटण्याचा प्रयत्ना केला. त्यासाठी तो त्यांच्या भरणेवाडी निवासस्थानी गेला होता. मात्र शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेण्याऐवजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्या शेतकऱ्याला न भेटता त्यांच्या चार चाकी वाहनात जाऊन बसले. वरून "तुम्ही मोठी माणसं आहात,मी साधा माणूस आहे," असे म्हणत त्यांनी शेतकऱ्याची थट्टा ही उडवली. शेतकऱ्याने 'मामा तुम्ही शब्द दिला होता' अशी आठवण करून दिली असता, भरणे यांनी "मी कोणताही शब्द दिला नव्हता, ज्यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले त्यांनाच पंचनामा करायला सांगा," असंही ते म्हणाले.
पुण्याच्या इंदापूर तालुक्यात कळस पट्ट्यात खडकवासल्याच्या पाण्यासाठी गेल्या महिनाभरापासून शेतकरी टाहो फोडत आहेत. 25 मे रोजी संतप्त शेतकऱ्यांनी सिंचन भवन येथे पाण्यासाठी आंदोलन केलं. या ठिकाणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली होती. शिवाय दोन किंवा तीन जूनला पाणी येईल असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र याच आंदोलनात आपण शेतकऱ्यांना काय आश्वासन दिलं होतं याचा विसर कृषिमंत्र्यांना पडलाय की काय असा प्रश्न या व्हिडिओमुळे उपस्थित होत आहे.
या भेटीदरम्यान संबंधित शेतकरी मंत्री भरणे यांना म्हणतो की,"मामा जळालेल्या ऊसाचे पंचनामे, त्यावर मंत्री भरणे म्हणतात माझ्याकडे नाही तुमचं, मी साधा माणूस आहे. गरीब माणूस आहे. तुम्ही मोठी माणसं आहात सगळी, मोठ्या माणसाचं ऐकून करणार, तुम्हाला ज्याने हे सांगितलं त्याला सांगा. त्यावर शेतकरी म्हणतो मामा तुम्ही शब्द दिला होता. त्यावर मंत्री भरणे म्हणतात, मी नाही तुम्हाला शब्द दिला. त्यावर शेतकरी म्हणतो तुम्ही सिंचन भवनला शब्द दिला होता. त्यावर मंत्री भरणे म्हणतात तुमचा आणि माझा काही शब्द नाही. तुम्ही आंदोलन केलं होतं." मंत्री भरणे असं बोलतात आणि निघून जातात. हा व्हिडिओ आता सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राज्याचे कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्याचं म्हणणं त्याच्या व्यथा ऐकून घेणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होतं. मात्र मंत्री भरणे यांनी असं न करता जबाबदारी झटकत थेट शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्या ऐवजी त्यांची चेष्टा केली. त्यांच्या प्रश्नांची थट्टा केली, हेच या संभाषणातून दिसून येत आहे. ज्यामुळे आता दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावा लागणार आहे. दरम्यान आपण शेतकऱ्याची कोणतीही चेष्ठा केलेली नाही. तो शेतकरी माझा नातेवाईकच आहे. बारामती आणि दौंडला पाणी मिळाले. त्यामुळे इंदापूरला मिळण्यास दोन दिवसाचा कालावधी लागणार होता. आता ते पाणी इंदापूरला आले आहे. शिवाय हे आंदोलन रोहीत पवारांनी केले होते. त्यांच्या आंदोलनामुळेच बारामतीला पाणी मिळाले आणि इंदपूरला पाणी मिळण्यास उशीर झाला असंही ते म्हणाले.