सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील वाकड परिसरातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घडली आहे. वाकड परिसरात शेजारीच राहणाऱ्या एका 61 वर्षीय वृद्धाने दोन सख्ख्या लहान बहिणींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 10 वर्षे आणि अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्यांवर या नराधमाने अत्याचार केला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी रमजान बागवान याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
हा सर्व प्रकार शेजारी राहणाऱ्या एका जागरूक महिलेच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला होता. संध्याकाळी मुलीचे आई-वडील कामावरून घरी परतल्यानंतर या महिलेने त्यांना दुपारी घडलेला भयानक प्रकार सांगितला. यानंतर आईने चिमुकलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी आरोपीने गेल्या दीड महिन्यात तिच्यावर 4 वेळा आणि तिच्या 4 वर्षांच्या लहान बहिणीवरही अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हे ऐकून पीडित कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.
( नक्की वाचा : Pune Nasrapur Case: 'आम्हाला अंधारात ठेवू नका'; नसरापूर प्रकरणातील पीडित कुटुंबाची सरकारला कळकळीची विनंती )
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ वाकड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. वाकड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून 61 वर्षांचा आरोपी रमजान बागवान याच्यावर पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तत्परतेने गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर कडक कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
नागरिकांमधून तीव्र संताप
काही दिवसांपूर्वीच नसरापूर येथे 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, तरीही विकृत प्रवृत्तीच्या नराधमांवर पोलिसांचा किंवा कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक आणि महिला विचारत आहेत. दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे.