Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस रेल्वे स्थानकावर शुक्रवारी एक अंगावर शहारा आणणारी घटना घडली. रेल्वे रूळ ओलांडत असताना अचानक समोरून मालगाडी आल्याने एका महिलेचा जीव धोक्यात आला होता. मात्र, घाबरून न जाता या महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे तिचा जीव थोडक्यात बचावला आहेत.
महिलेच्या डोक्यावरुन धावत राहिली रेल्वे...
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी अचानक एका भरधाव मालगाडी समोरून आली. रेल्वे अगदी जवळ आल्याचे पाहून आता पळून जाणे शक्य नाही, हे महिलेच्या लक्षात आले. मात्र अशा परिस्थितही महिला घाबरली नाही. तिने थेट रेल्वे रुळांच्या मधोमध ज्याला ट्रॅक बेड म्हटलं जातं तिथं झोपण्याचा निर्णय घेतला.
डोळ्यासमोर मृत्यू उभा असतानाही महिलेने दाखवलेले चातुर्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला. संपूर्ण मालगाडी अंगावरून जाईपर्यंत ही महिला शांतपणे रुळांच्या मधे झोपून राहिली. मालगाडी निघून गेल्यावर ती महिला सुखरूप उभी राहिली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.