रेवती हिंगवे, पुणे
Pune News: पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहेत. गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यातच आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. रामटेकडी परिसरात नवीन पोलीस चौकी सुरू करताना त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडणी करत, परिसरातील अवैध धंदे, गुन्हेगारी कृत्ये आणि वाहतूक समस्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.
अवैध धंद्यांवर 6 तासांत कारवाईचे निर्देश
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्वात आधी अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिली की, "सर्वप्रथम जे काही अवैध धंदे या परिसरात आहेत, त्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना आहे सहा तासांच्या आत, उद्या सूर्योदयाच्या पूर्वी, अशा प्रकारचे अवैध धंदे तोडून टाका. तसेच, रेकॉर्डवर असलेले अवैध दारू विकणारे, गांजा विकणारे, ड्रग्ज विकणारे आणि इतर अवैध कृत्य करणाऱ्यांची याच भागात परेड काढून त्यांचे मनपरिवर्तन करावे. मनपरिवर्तन होत नसेल, तर 'खाकी भाषेत' त्यांचे मनपरिवर्तन करा, असा सज्जड दम त्यांनी दिला.
गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांवर लक्ष
अमितेश कुमार यांनी विधी संघर्ष बालक आणि लहान मुले व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारी कृत्यांकडे वळत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अवैध दारू, गांजा आणि इतर व्यसनांमुळे हा प्रकार वाढतो, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे या परिसरात एक थेंब अवैध दारू पण विकू देणार नाही, असा इशारा दिला. अधिकृत दारूविक्री करणाऱ्यांना वेळेचे बंधन पाळण्याची सूचना केली. तसेच, नियमांचे उल्लंघन करून जर 'अंडा आणि फिंगर' असे पदार्थ विकत असतील, तर ते त्वरित बंद करावेत.
गुंडगिरी आणि महिलांची सुरक्षा
चौकात, नाक्यावर लोक टपोरी सारखे बसतात. काही काम-धंदा नाही. घरात त्यांचं मन लागत नाही, शिक्षण घ्यायचे नाही, रस्त्यावर बसून थर्ड क्लासगिरी करायची. महिलांना वाईट नजरेने बघायचे. त्या सगळ्यांना उचला आणि जरा स्वच्छ करण्याची कारवाई करा. तसेच, रस्त्यावर दिसणारे भंगाराचे ढिग आणि अवैध टपऱ्या त्वरित हटवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
सावकारी आणि भ्रष्टाचारावर वचक
काही नागरिकांनी सावकारी आणि जमिनी हडपण्याच्या तक्रारी केल्यावर आयुक्तांनी यावरही कठोर पाऊल उचलण्याची तयारी दर्शविली. जर कोणी सावकारी करत असेल आणि गोरगरिबांचे जमीन-विमीन लिहून घेत असेल, तर त्या सावकाराला आणा. आम्ही त्याचं तोंड बघू. त्याचा इथेच चौकात एक दिवशी सत्कार करू, असा इशाराही अमितेश कुमार यांनी दिला.