Pune News: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना AI च्या मदतीने धडा शिकवणार; पुणे पोलिसांचा अभिनव प्रयोग

गस्ती वाहनांमध्येही एआय पाळत ठेवणारे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोलिसांना स्थिर कॅमेऱ्यांच्या व्यतिरिक्तही गस्तीदरम्यान नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होईल.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर आणि बेशिस्तपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी एक अभिनव आणि आधुनिक पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शहरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित वाहतूक नियंत्रण यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे आता वाहतूक पोलिसांच्या मदतीशिवायच नियम तोडणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे.

या प्रकल्पाचा पायलट टप्पा 28 मे 2025 रोजी फर्ग्युसन कॉलेज रोड येथे सुरू करण्यात आला होता. सेनसेन नेटवर्क्सचे संचालक विजय खूपसे यांच्या तांत्रिक सहकार्याने दोन महिन्यांच्या कालावधीत या स्वयंचलित यंत्रणेने 3,949 वाहतूक नियमभंगाच्या घटनांची नोंद केली.

(नक्की वाचा-  Pune Metro Daily Pass: कुठेही, कितीही वेळा फिरा; फक्त 100 रुपयांत! गणेशोत्सवापूर्वी पुणे मेट्रोची भन्नाट योजना)

यामध्ये नो-पार्किंगचे 1,335 प्रकरणे, दुहेरी पार्किंगचे 1,886 प्रकरणे., चुकीच्या दिशेने वाहन चालवण्याचे 719 प्रकरणे, ट्रिपल सीट जाण्याचे 42 प्रकरणे,वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करण्याचे 9 प्रकरणे समोर आली आहेत. या पायलट प्रोजेक्टमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार, केवळ 1 टक्के गुन्हेगार हे पुन्हा-पुन्हा नियम मोडणारे होते. जे वाहतूक शिस्तीत लक्षणीय सुधारणा दर्शवते. एआयच्या या यशस्वी निरीक्षणामुळे पायलट झोनमधील वाहतूक कोंडीही कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 (नक्की वाचा: माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी, पुणेकरांसाठी आनंदवार्ता )

प्रकल्पाच्या यशामुळे पुणे पोलिसांनी आता गस्ती वाहनांमध्येही एआय पाळत ठेवणारे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोलिसांना स्थिर कॅमेऱ्यांच्या व्यतिरिक्तही गस्तीदरम्यान नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होईल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर पोलीस दलाच्या सर्व गस्ती वाहनांमध्ये एआय प्रणाली बसवण्याची योजना आहे.

Advertisement

Topics mentioned in this article