देवा राखुंडे, इंदापूर
भाजप नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. हर्षवर्धन पाटील 7 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जयंत पाटील यांनी म्हटलं की, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाली 10 वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होईल.
(नक्की वाचा - रत्नागिरीतील तरुणांसाठी खूशखबर! CM एकनाथ शिंदेंची दोन मोठ्या प्रकल्पांना मान्यता)
इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांसह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार यांसह बडे नेते नेते उपस्थित राहणार आहेत.
(नक्की वाचा - राहुल गांधी आज नाहीतर उद्या कोल्हापुरात; दौऱ्यामागचं राजकारण काय?)
अंकिता पाटील ठाकरे यांचा राजीनामा
हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी भाजपच्या पुणे जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांना राजीनामा सोपवला आहे.