जाहिरात

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर पोलिसांची मोठी मोहीम, अनेक धक्कादायक बाबी समोर, प्रवाशांना मात्र दिलासा

Pune Railway Station News: पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि स्वच्छता वाढवण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी (GRP) गेल्या दोन महिन्यांत एक विशेष मोहीम राबवली आहे.

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर पोलिसांची मोठी मोहीम, अनेक धक्कादायक बाबी समोर, प्रवाशांना मात्र दिलासा

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणि लोहमार्ग पोलिसांनी कंबर कसली आहे. रेल्वे स्थानक परिसर आणि प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या भिकाऱ्यांमुळे होणारा त्रास आणि अस्वच्छता रोखण्यासाठी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत तब्बल 60 भिकाऱ्यांना स्थानक परिसरातून ताब्यात घेऊन सरकारी पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळावे, यासाठी ही मोहीम हाती घेतल्याचं पोलिसांनी सांगितले.

येरवड्याच्या 'भिकारी गृहात' रवानगी

सर्व 60 व्यक्तींना येरवड्यातील फुलेनगर येथे असलेल्या शासकीय भिकारी गृहात पाठवण्यात आले आहे. केवळ त्यांचे पुनर्वसन न करता, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तिथे विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये झाडू बनवणे, शिवणकाम आणि इतर कौशल्यांचा समावेश आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात सन्मानाने जगता येईल आणि भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर पुन्हा येणार नाही.

प्रवाशांना दिलासा

रेल्वे स्थानकावर भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवासी आणि रेल्वे प्रशासन दोघेही त्रस्त होते. हे लोक प्लॅटफॉर्म, रेल्वेचे डबे आणि स्थानकाच्या मुख्य प्रवेश व निकास द्वारांवर मोठ्या प्रमाणावर कचरा आणि अस्वच्छता पसरवत होते. याशिवाय, अनेक भिकारी रेल्वे गाड्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना पैशांसाठी त्रास देत असल्याच्या आणि त्यांच्याशी हुज्जत घालत असल्याच्या असंख्य तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे या कारवाईमुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

तपासणीत धक्कादायक बाबी समोर

ताब्यात घेतलेल्या भिकाऱ्यांमध्ये देशाच्या विविध भागांतील लोकांचा समावेश आहे, जे गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे स्थानकातील विश्रामगृह आणि प्रसाधनगृहांचा वापर करून तिथेच राहत होते. यामध्ये काही लोकांची स्मरणशक्ती कमी झाल्याचे आढळून आले. अनेक जण अंमली पदार्थांच्या आहारी गेले होते. व्यसनाधीनतेमुळे काही जण रेल्वे स्थानकावर चोऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये देखील सामील असल्याचे तपासात उघड झाले. काही जण घरातून पळून आले होते आणि कामधंदा करण्याऐवजी त्यांनी भीक मागण्याचा सोपा मार्ग निवडला होता.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com