राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
वर्षानुवर्षे पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. शासनाकडून तयारीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण पावसाळ्याच्या पहिल्याच सरीत सगळा कारभार पाण्यात जातो. शहराचे नियोजन, यंत्रणेचा प्रतिसाद, आणि प्रशासनाची जबाबदारी यावर आता नागरिकांनी खऱ्या अर्थाने सवाल विचारायला हवा. पहिल्याच मोठ्या पावसामुळे पुण्यात प्रशासनाचे तीनतेरा उडाले. पालिकेचे सर्व दावे फोल ठरले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंगळवारी रात्रीपासून पुणे शहरात पडलेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या तयारीची पोलखोल केली. शहरातील अनेक नाले तुंबले, रस्त्यांवर पाणी साचले, झाडे कोसळली आणि काही ठिकाणी वीज खंडित झाली. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी उशिरा व दुपारनंतर मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने सिंहगड रस्ता, सेनापती बापट रस्ता, बाणेर, चांदणी चौक, कर्वेनगर, नळस्टॉप, डेक्कन, शनिवारवाडा, कोथरूड, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, मुंढवा, हडपसर, कात्रज, हिंगणे, धायरी, येरवडा, खराडी आदी परिसर जलमय झाले.
वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण
नुकत्याच उद्घाटन झालेल्या सिंहगड रस्त्यावरील संपूर्ण उड्डाण पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. जवळपास दोन किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आहे. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची वाहतूककोंडीचे दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
नक्की वाचा - Mumbai Rain : वाहतूक कोंडीला वैतागले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मुंबई मेट्रोने प्रवास
प्रभावित भागांत स्थिती
• अनेक झाडे कोसळल्याने रस्ते अडथळ्याने बंद झाले.
• काही घरांमध्ये पाणी शिरले.
• रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली, परिणामी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
• महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या मदतीस फारसे पोहोचले नाहीत.
प्राथमिक अहवाल…
• 30 ठिकाणी झाडे कोसळली: काही झाडे थेट गाड्यांवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले.
• वीज पुरवठा खंडित: अनेक भागांत लाईट गेल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले.
• स्मार्ट सिटी व रस्ता विकास योजनेतील उणीवा: नाल्यांचे कार्य अपूर्ण, जलनिकासी व्यवस्था अपयशी ठरली.
पुण्यात मंगळवारी किती पाऊस पडला? (मिमीमध्ये):
• बिबवेवाडी – 48.4
• वारजे – 40.8
• कोथरूड – 39.8
• एरंडवणा – 37.9
• डेक्कन – 37.8
• शिवाजीनगर – 34.1
पालिकेच्या ‘पारदर्शक' कामांवर प्रश्नचिन्ह:
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व जलनिकासी यंत्रणा दुरुस्त करण्याचे दावे पालिकेने वारंवार केले. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाले तुंबलेले दिसले. पावसामुळे रस्त्यांचे हालत खराब झाली असून, पायवाटेवरून प्रवास करणेही अवघड बनले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरून पालिकेच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. अनेकांनी ‘स्मार्ट सिटी' प्रकल्पावरही प्रश्न उपस्थित केले.