जाहिरात

Pune Rain Alert: पुण्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; तर विदर्भात 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

Weather Update: पुणे शहरात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Pune Rain Alert: पुण्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; तर विदर्भात 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

अजिंक्य धायगुडे, पुणे

महाराष्ट्र राज्यात सध्या हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांसाठी आज दिलासादायक बातमी आहे. शहरात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तविली आहे. दरम्यान, राज्याच्या दुसऱ्या भागात म्हणजेच विदर्भात मात्र सूर्याचा प्रकोप कायम असून, तिथे तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणेकरांना उकाड्यापासून मिळणार दिलासा?

पुण्यात गेल्या काही दिवसांत उन्हाचे चटके काहीसे कमी झाले असले, तरी हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. वाढलेल्या या उकाड्याने आणि घामाने पुणेकर पुरते बेजार झाले आहेत. अशातच आज शहरात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा

हवामान विभागाने केवळ पुणेच नाही, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांना पावसाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात उष्णतेचा 'रेड' आणि 'ऑरेंज' अलर्ट

विदर्भात उन्हाची तीव्र लाट रविवारीही कायम होती आणि आजही ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.  त्यामुळे नागरिकांना दुपारच्या वेळी अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा आणि खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Fuel Price Hike Today: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ; चेक करा नवीन दर)

तर अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागातही नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागणार आहे. नागरिकांनी हवामानातील या बदलांची नोंद घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com