सुरज कसबे
पिंपरी-चिंचवड शहरात आणि धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 24 तास कार्यरत राहणारी एक विशेष आपत्कालीन व्यवस्थापन टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ही टीम तीन शिफ्टमध्ये काम करणार आहे. भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील नद्यांची पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने निर्णय घेणे, आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे, बचावकार्य प्रभावीपणे राबवणे यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिफ्टची माहिती देण्यात आली आहे.
या टीममधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाशी सतत संपर्कात राहून समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना परिस्थितीनुसार तातडीने आणि समन्वयाने आपत्ती निवारणाचे कार्य पार पाडण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान महापालिकेच्या वतीने नागरिकांना अतिवृष्टीदरम्यान धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा - Dombivali Rain: पावसाचा दणका! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यात कंबरेपर्यंत पाणी
तसेच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नदीकाठच्या परिसरातील लोकांना सतर्क करण्यासाठी आणि संभाव्य पूर परिस्थितीची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना दिल्या जात आहेत. त्याचबरोबर, नदीकाठच्या घाट परिसरात पाहणी करून विशेष लक्ष ठेवले जात आहे.