जाहिरात

Pune Rain : नागरिक अडकले, वाहने पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत... पुण्यात पावसाची सद्यस्थिती काय?

Pune Rain Update : लवासा रोड,  मुळशी येथे दरड कोसळली असून एनडीआरएफच्या टीमला बचाव कार्यासाठी कळवण्यात आले आहे.

Pune Rain : नागरिक अडकले, वाहने पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत... पुण्यात पावसाची सद्यस्थिती काय?

राहुल कुलकर्णी, पुणे

पुण्यात रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. खडकवासला धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. अनेक भागात 3-4 फुटांपर्यंत पाणी साचलं होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या. वाहतूकीवरही देखील पावसाचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी आपत्तीव्यवस्थापन पथकाचे जवान तैनात आहे. नागरिकांना सुखरुप ठिकाणी नेलं जात आहे.

पुण्यातील पाऊस सध्या थांबला आहे. गेल्या तासाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पाणी देखील हळूहळू ओसरायला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुण्यात अद्यापही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच खडकवासला पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरु आहे. सकाळपासून पुण्यातील स्थिती काय आहे, यावर एक नजर टाकूया. 

जिल्हा आपत्तीव्यवस्थापन विभागने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. 

पुणे महानगरपालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोडवरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी, विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

तिघाचा शॉक लागून मृत्यू

भिडे पुलाशेजारील पूलाचीवाडी येथील 3 युवकांना शॉक लागून मयत झाले आहेत. त्यांची नावे अभिषेक घाणेकर, आकश माने व शिवा परिहार अशी आहेत. लवासा रोड,  मुळशी येथे दरड कोसळली असून एनडीआरएफच्या टीमला बचाव कार्यासाठी कळवण्यात आले आहे.

नागरिक घरात अडकले

निंबजनगर परिसरातील सोसायटी व सिंहगड रोड वरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने घरात लोक अडकले आहेत. त्यांना खाद्य पदार्थ आणि पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे. भिमाशंकर-खेड रोडवर दरड कोसळली असून खेडमधून भिमाशंकरकडे जाणार रस्ता बंद आहे. वेल्हा तालुक्यातील वडघर येथे डोंगराची माती रस्त्यावर आली होती. ती माती बाजूला करून रस्ता वाहतूक सुरू केली आहे.

मौजे-दासवे ता. मुळशी लवासा लेक सिटी येथील बंगल्यावर दरड कोसली आहे. सदर बंगल्यात ३ जण अडकले असल्याबबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. एनडीआरएफ टीम काम करत आहे. त्याच बरोबर पर्यटन स्थळ ठिकाणी 24 तासाकरिता बंदी आदेश जारी करण्यात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com