
Maharashtra Rain Update : गेल्या आठवड्यापासून मराठवाड्यात पावसानं थैमान घातलं आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघरमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रालाही पावसाचा तडाखा बसला आहे. यंदा नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पावसाने हजेरी लावली. आज सप्तमीला कसा असेल पाऊस?
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आज 29 सप्टेंबरला पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची अधून मधून रिपरिप सुरू आहे. सध्या रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.
उद्या 30 सप्टेंबरलाही राज्यातील अनेक जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Punjabrao Dakh Vs IMD : राज्यात पावसाची बॅटिंग सुरूच! पंजाबराव डख आणि IMD चा अंदाज काय?
जायकवाडी विसर्गामुळे दहा हजार नागरिकांचं स्थलांतर
जायकवाडी विसर्गामुळे जालना जिल्ह्यात सुमारे 10,000 लोकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, यातील 6870 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. परतूर, अंबड, घनसावंगी येथील हे नागरिक आहेत. त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. 23 ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. अनेक शेतकर्यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चारा देण्यात येत आहे.
उजनी धरणातील विसर्ग वाढवला...
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून भीमा नदी पात्रात उजनी धरणातून 86 हजार 600 क्युसेकने विसर्ग केला जातोय. उजनी धर्माच्या 16 दरवाजातून हा विसर्ग केला जातोय. काल कमी करण्यात आलेल्या निसर्गात रात्रीपासून पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे.
काल रात्री तो 50 हजार होता त्यानंतर रात्री अकरा वाजता तो 75 हजार करण्यात आला आणि आज सकाळी सहा वाजता वाढ करून तो 86 हजार 600 क्युसेकने इतका करण्यात आला आहे आणि यामध्ये देखील आणखी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरलेलं असून उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे.मात्र पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात दौंड बंधाऱ्यांमधून जवळपास एक लाख क्युसेकने पाण्याची आवक होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा विसर्ग केला जातोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world