जाहिरात

Pune Rain: पुण्यात एप्रिलमध्येच पावसाळा! मुसळधार पावसाने पुणेकरांची उडवली दैना, वाहने पाण्यात तरंगली

Pune Rain: भरदुपारी शहरात अक्षरशः पावसाळी काळोख दाटून आला आणि बघता बघता आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस सुरू झाला.

Pune Rain: पुण्यात एप्रिलमध्येच पावसाळा! मुसळधार पावसाने पुणेकरांची उडवली दैना, वाहने पाण्यात तरंगली
Pune Rain : या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं.
पुणे:

Pune Rain:  पुणेकर सध्या उन्हाच्या चटक्यांनी हैराण असतानाच निसर्गाने गुरुवारी वेगळंच रुप दाखवलं. दुपारी रणरणत्या उन्हाचा अनुभव घेणाऱ्या पुणेकरांना अचानक आलेल्या एका वादळाने हादरवून सोडले. भरदुपारी शहरात अक्षरशः पावसाळी काळोख दाटून आला आणि बघता बघता आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस सुरू झाला.  या पावसाने पुणे शहरासह ग्रामीण भागालाही झोडपून काढले असून अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

या पावसामुळे पुण्यातील जंगली महाराज रोड, स्वारगेट आणि वारजे यांसारख्या प्रमुख भागांमध्ये रस्त्यांवर 1 ते 2 फूट पाणी साचले. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले असून काही ठिकाणी रस्त्यावरील वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत.

सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

( नक्की वाचा : Konkan Railway : दादर-रत्नागिरी ट्रेन विसरा! आता चक्क बोरिवली-वसईमार्गे गाठा कोकण; वाचा रेल्वेचा नवा मार्ग )

वाहनचालकांवर दिवे लावण्याची वेळ

विजेच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे शहरात उजेड इतका कमी झाला की वाहनचालकांना भरदिवसा आपल्या वाहनांच्या हेडलाईट सुरू कराव्या लागल्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कोणाकडेही छत्री किंवा रेनकोट नव्हता, अशातच अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.

सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी आणि पिंपरी चिंचवड परिसरात गारांसह पाऊस पडल्याने तापमानात जरी घट झाली असली तरी जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.

पुढील दोन दिवस महत्त्वाचे; प्रशासनाचे आवाहन

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात पुढील 2 दिवस आकाश ढगाळ राहणार असून संध्याकाळच्या वेळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

या पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी पावसाच्या वेळी झाडाखाली उभे राहू नये आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या या अवकाळी सत्रामुळे पुणेकरांना आता उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com