रामराजे शिंदे, प्रतिनिधी
Dadar Ratnagiri Train: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणि विशेषतः मुंबईतून रत्नागिरीला जाणाऱ्या सर्वांसाठी एक अत्यंत मोठी आणि तितकीच चक्रावणारी बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दादर-रत्नागिरी पॅसेंजरची कोकणवासी वाट पाहत होते, त्या मागणीला रेल्वे प्रशासनाने केराची टोपली दाखवलीय. इतकेच नाही तर, आता कोकणात जाण्यासाठी रेल्वेने असा काही अजब तोडगा काढला आहे की, भविष्यात कोकण रेल्वेचा संपूर्ण नकाशाच बदलणार आहे..
दादर विसरा आता नवा मार्ग
कोरोना काळापासून बंद झालेली आणि सध्या फक्त दिवा स्थानकापर्यंत धावणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर पुन्हा दादर किंवा सीएसएमटीपर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी कोकणवासीयांकडून केली जात होती. यासाठी राजकीय स्तरावरही मोठे प्रयत्न झाले.
मात्र, दिल्लीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर खासदार रवींद्र वायकर यांनी दिलेली माहिती प्रवाशांना धक्का देणारी आहे. रेल्वे प्रशासनाने दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करण्यास स्पष्ट नकार दिला असून, आता ही ट्रेन चक्क पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार असल्याचे संकेत दिले आहेत.
( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांची चंगळ! खिसा गरम होणार अन् टॅक्सही वाचणार; 1 एप्रिलपासून 'या' नियमामुळे पगार वाढणार )
काय आहे रेल्वेचा प्लॅन?
खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्याची रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन आता पश्चिम रेल्वेमार्गावरून वसईला जाईल आणि तिथून पुढे पनवेलमार्गे कोकणात रवाना होईल. पुढील दीड ते ते दोन वर्षांत एका नवीन रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
त्यानंतर कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस याच नव्या मार्गाने वळवल्या जातील. म्हणजेच, भविष्यात मुंबईच्या मध्य रेल्वेवरील गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वेचा मार्गच बदलण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
कोकण रेल्वेचा असा असेल नवा प्रवास
रेल्वेच्या या नव्या नियोजनानुसार, कोकणात जाणाऱ्या गाड्या आता वेस्टर्न लाईनवरून बोरिवलीमार्गे जुईचंद्रा, कमान रोड, खरबाव, डुंगे, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, नांदवली, तळोजे आणि कळंबोली अशा मार्गाने पनवेलला पोहोचतील. तिथून पुढे या रेल्वे कोकणच्या दिशेने धावतील. हा बदल रेल्वेच्या दृष्टीने ट्रॅफिक कमी करण्याचा उपाय असला तरी, दादर किंवा सीएसएमटीवरून गाडी पकडणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी यामुळे निश्चितच वाढणार आहे.
या नव्या बदलांवरून राजकारण तापण्याची शक्यता ओळखून खासदार रवींद्र वायकर यांनी आवाहन केले आहे की, प्रवाशांना नवीन मार्ग मिळणार आहे, त्यामुळे यात राजकारण आणू नये. नवीन मार्ग तयार करण्यासाठी 1 ते 2 वर्षांचा वेळ लागणार असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world