रेवती हिंगवे, प्रतिनिधी
PMC Operation Pinjara: एका बाजूला ग्रामीण पुण्यात बिबट्यांची दहशत वाढलेली असताना, दुसरीकडे पुणे शहराच्या दाट लोकवस्त्यांमध्ये आणि मध्यभागातील पेठांमध्ये उंदरांचा (Rats) सुळसुळाट झाला आहे. शहरातील रस्त्यांवरून चालताना अचानक उड्या मारणारे उंदीर आणि घुशींमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा वाढता उपद्रव पाहता, पुणे महापालिकेला (PMC) आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'ऑपरेशन पिंजरा' मोहीम (Operation Pinjara) सुरू करावी लागली आहे.
उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेची हेल्पलाईन
उंदीर आणि घुशींच्या वाढत्या त्रासाला तोंड देण्यासाठी पुणे महापालिकेने नागरिकांसाठी एक विशेष हेल्पलाईन (Helpline) सुरू केली आहे. नागरिकांनी तक्रार नोंदवताच, पालिकेचा कीटक प्रतिबंधक विभाग (Pest Control Department) तातडीने कामाला लागतो. विभागाचे कर्मचारी संबंधित ठिकाणी जातात, पिंजरे (Traps) लावतात आणि त्यात पकडल्या गेलेल्या उंदरांची योग्य विल्हेवाट लावतात.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांची होणार ट्रॅफिकमधून सुटका! पुणे मेट्रो 3 चा बाणेरपर्यंत विस्तार, वाचा सर्व माहिती )
नवीन पिंजऱ्यांची खरेदी
'ऑपरेशन पिंजरा' मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी महापालिकेने 1 लाख रुपये खर्च करून नवीन पिंजरे खरेदी केले आहेत. महापालिकेकडून खरेदी करण्यात येत असलेल्या एका पिंजऱ्याची किंमत सुमारे 1,800 ते 1,900 रुपये आहे. रॉड टाईप वायर' (Rod Type Wire) असलेले पिंजरे अधिक टिकाऊ आणि परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे.
या मोहिमेअंतर्गत महापालिकेने दरमहा सरासरी 300 उंदीर पकडण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. पिंजरे लावण्यासोबतच, उपद्रवग्रस्त नागरिकांना उंदीर मारण्याच्या औषधांचाही (Rat Poison) पुरवठा महापालिकेकडून केला जात आहे.
( नक्की वाचा : Pune MHADA : पुणे म्हाडा लॉटरीचे 'द्वार' आणखी उघडले! 'या' तारखेपर्यंत अर्ज करा; घराचं स्वप्न होईल पूर्ण )
कुठे लावले जातात पिंजरे?
पुणे शहरातील सर्वाधिक उपद्रव असलेल्या ठिकाणी हे पिंजरे उभारले जात आहेत. यात प्रामुख्याने गल्लीबोळ, बाजारपेठा (Markets), हॉटेल परिसर (Hotel Areas) आणि नाल्यांजवळच्या (Drains) जागांचा समावेश आहे. पिंजरे लावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी पकडलेल्या उंदरांची योग्य प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाते.
पुणे महापालिकेने उंदरांच्या या समस्येकडे आता गांभीर्याने लक्ष दिले आहे. मात्र, 'ऑपरेशन पिंजरा'मुळे पुणेकरांना खरोखरच या त्रासातून दिलासा मिळतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.