देविदास राखुंडे, दौंड
Pune News: पुणे ग्रामीण पोलीस दलाने दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. एका चिकन सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला आणि एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करत पोलिसांनी सलीम आदम शेख या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी सलीम शेखची कसून तपासणी केली असता, त्याच्याजवळ तब्बल 1 किलो 383 ग्रॅम वजनाचा विक्रीस बंदी असलेला गांजा आढळून आला.
( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
गांजाची किंमत किती?
बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या या गांजाची अंदाजित किंमत 20 हजार 745 रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा संपूर्ण गांजाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे कुरकुंभ परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुणे ग्रामीण पोलीस अवैध धंदे पूर्णपणे संपवण्यासाठी कठोर पाऊले उचलत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे कुरकुंभ आणि आसपासच्या परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवैध अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world