अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे
Pune News: पुण्यातील स्पर्धा परीक्षेचे केंद्र असलेल्या सदाशिव पेठ परिसरात सध्या विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरचा पुरवठा अचानक खंडित झाल्याने पेठेतील छोटी-मोठी हॉटेल्स आणि खानावळींचे टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. याचा सर्वाधिक फटका सकाळी नाश्ता करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या खानावळी आणि नाश्त्याची हॉटेल्स एकामागून एक बंद पडू लागली आहेत.
विद्यार्थ्यांचे हाल आणि 'इडली'चा आधार
सदाशिव पेठ, शनिवार पेठ आणि नवी पेठ परिसरात हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राहतात. पोहे, उपमा, वडा-पाव किंवा गरमागरम चहा देणारी छोटी हॉटेल्स गॅस नसल्याने बंद झाली आहेत. हॉटेल मालकांनी 'गॅस संपला आहे' असे बोर्ड लावले आहेत.
(नक्की वाचा- Ashok Kharat Case: अशोक खरातचा लोकांना फसवण्याचा 'रिमोट कंट्रोल' पॅटर्न, पैसे कसे उकळायचा?)
गॅस लागत नसल्याने केवळ वाफेवर तयार होणारी 'इडली' सध्या काही ठिकाणी उपलब्ध आहे. मात्र, जर गॅसचा पुरवठा त्वरित झाला नाही, तर इडली मिळणेही कठीण होणार आहे. सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे.
(नक्की वाचा- Ashok Kharat Case: अशोक खरातबाबतचे आतापर्यंतचे 10 मोठे खुलासे, पोलिसांसह सारेच चक्रावले)
पुरवठा का खंडित झाला?
गॅस एजन्सीकडून होणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. हॉटेल मालकांचे म्हणणे आहे की, बुकिंग करूनही सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे. व्यवसाय बंद राहिल्याने या छोट्या व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. एलपीजी गॅस पुरवठा पूर्ववत व्हावा आणि दोन घास वेळेवर मिळावे अशी आशा आता स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world