यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Metro Tunnel Leakage Case Update : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील पुणे मेट्रो प्रकल्पासंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आला होता. या संदर्भात सर्वप्रथम बातमी एनडीटीव्ही मराठीने दिली होती. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भूमिगत बोगद्याला बोरवेल खोदताना भगदाड पाडल्याच्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आरोपींना मोठा दणका दिला आहे. घरमालक आणि बोअरवेल ठेकेदार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
मेट्रो प्रशासनात खळबळ उडाली
ही घटना शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलीस स्टेशनसमोर घडली होती. शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गावर चाचण्या सुरू असताना, वरच्या भागात सुरू असलेल्या बोरवेल ड्रिलिंगदरम्यान सुमारे 60 ते 70 फूट खोलीवर असलेल्या बोगद्याच्या छताला छेद लागला. यामुळे तब्बल 6 इंचांचे भगदाड पडले.
नक्की वाचा >> CCTV Video: अंबरनाथमध्ये रस्ता क्रॉस करण्यावरून मोठा वाद, दुचाकीस्वाराने विद्यार्थ्याला फरफटत नेलं अन् घडलं..
या भगदाडातून बोगद्यात पाणी आणि चिखल झिरपू लागल्याने मेट्रो प्रशासनात खळबळ उडाली. सुदैवाने, तातडीने पावलं उचलत ते भागधार बुजवण्यात आलं. सुमारे अडीच लाख रुपये खर्च त्यासाठी करावा लागला. त्याचा खर्च घरमालक आणि बोरवेल कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आला.
मेट्रो प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
या प्रकरणी महामेट्रोने गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, मेट्रोसारख्या सार्वजनिक प्रकल्पाला हानी पोहोचवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. तसेच, आवश्यक परवानगी न घेता 50 मीटर परिसरात खोदकाम केल्याने नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचेही नमूद केले.
नक्की वाचा >> Badlapur News: बदलापूर शहरातील विकासकामे ठप्प, ठेकेदारांचं कामबंद आंदोलन, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे म्हणाल्या..
दरम्यान, या घटनेत सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाला. मेट्रो प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भूमिगत बोगद्यांच्या परिसरात कोणतेही खोदकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.