Pune News : पुणे जिल्ह्यातील शिरूर जिल्ह्यातील पिंपरखेळ येथे बिबट्या विरुद्ध मानव असा संघर्ष पेटला आहे. काही दिवसांपूर्वी या गावातील विलास बोंबे नावाच्या १३ वर्षांच्या मुलावर बिबट्याने झडप घातली. यात मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. रविवारी १२ ऑक्टोबर रोजीही येथेच पाच वर्षांच्या शिवन्या बोंबेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनांमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याने आमच्या जीवाला धोका असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपरखेड ( आंबेवाडी) तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलाचा दुपारी 3.45 वाजता बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो घराजवळील ऊसाच्या शेतात शौचालयास गेला होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. त्याला उसाच्या शेतातून बाहेर ओढत त्याच्या नरड्याचा घोट घेतला. मुलाचा आवाज ऐकताच त्याचे आई- वडील धावत ऊसाच्या शेतात गेला. त्यावेळी बिबट्या त्यांच्यावरही गुरगुरत होता. कसं बसं त्यांनी मुलाला त्याच्या तावडीतून सोडवलं. त्यांनी तातडीने रोहनला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यानंतर रविवारीही पाच वर्षांच्या शिवन्या बोंबेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे संतापलेल्या स्थानिकांनी रास्ता रोको केला.
बिबट्याला ठार करा...
दरम्यान तातडीची उपाययोजना म्हणून माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली आहे. या आदेशानंतर शार्प शूटरच्या टीमचं घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. हा चमू सकाळी योग्य संधी घेत पुढील कार्यवाही करणार आहे.
सध्या परिसरात २५पिंजरे आणि दहा ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून ड्रोनद्वारे टेहळणी तसेच जन जागृती करण्याचे कामं वन विभाग करत आहे. या प्रकरणी वनसंरक्षक आशिष ठाकरे व जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वनसंरक्षक स्मिता राजहंस व अमृत शिंदे व वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाने त्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह पुढील कार्यवाही करत आहेत