Pune News: संतापजनक! भाड्यावरून वाद, कॅब चालकाने आयटी इंजिनिअरचे बोट चावून तोडले

Pune Crime News: हिंजवडी ते नाना पेठ प्रवासासाठी रॅपिडो कॅब बुक केली असता, मीटरप्रमाणे भाडे देण्याच्या वादातून चालकाने आयटी कर्मचाऱ्याच्या डाव्या हाताचे बोट चावून तोडले.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या एका आयटी इंजिनिअरसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कॅब चालकाने क्षुल्लक वादातून आयटी इंजिनिअरचे बोट चक्क चावून तोडल्याची घटना घडली आहे. इंजिनिअरच्या बोटाचा वरचा भाग तुटून वेगळा झाला आहे.

वादाचे नेमके कारण काय?

तक्रारदार 42 वर्षीय तंत्रज्ञ हिंजवडी फेज 1 मधील एका नामवंत आयटी कंपनीत कार्यरत आहे.  सोमवारी शिफ्ट संपल्यानंतर त्यांनी घरी (नाना पेठ) जाण्यासाठी 'रॅपिडो' (Rapido) वरून कॅब बुक केली. कॅब चालक आल्यावर त्याने ॲपवर दिसणाऱ्या भाड्याऐवजी 'मीटर'प्रमाणे भाडे देण्याचा हट्ट धरला. प्रवाशाने ॲपवरील भाड्यापेक्षा जास्त पैसे देण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वीच हा वाद इतका वाढला की, चालकाने प्रवाशावर हल्ला केला आणि त्यांच्या डाव्या हाताचे बोट तोंडात धरून जोरात चावा घेतला.

Advertisement

(नक्की वाचा-  रुग्णाची हॉस्पिटलकडे एक मागणी अन् 1 लाखाचे बिल 57 हजारांवर, सगळ्यांना जागृत करणारी पोस्ट)

पीडित तरुणाची अवस्था

या हल्ल्यात इंजिनिअरच्या बोटाचा काही भाग तुटला असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पीडिताने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी कॅब चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुण्यासारख्या शहरात आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ॲपवर आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्या आपल्या चालकांची पडताळणी योग्यरीत्या करतात का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

(नक्की वाचा-  Dhurandhar 2: 'धुरंधर 2' ने उडवला धुरळा! 'बडे साहब'वरूनही पडदा उठला, अंडरवर्ल्ड डॉनला पाहून थक्क व्हाल!)

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वीच भाड्यावरून वाद झाला होता. आरोपीने रागाच्या भरात प्रवाशावर शारीरिक हल्ला केला. आम्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे."
 

Topics mentioned in this article