राहुल कुलकर्णी, पुणे
स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपाली पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या दत्तात्रय गाडेला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलं आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या गुनाट गावातूनच शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. फरार झाल्यापासून आरोपी उसाच्या फडात लपून बसला होता. गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस पथके त्याच्या मागवर होती. 250 पेक्षा अधिक पोलीस, स्थानिक नागरिकांची मदत यामुळे आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यात यश आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोपी दत्तात्रय गाडेला कसं पकडलं?
पोलिसांनी ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु केलं होतं तिथं तो नव्हताच. आरोपी रात्री नोतेवाईक महेश बहीरट यांच्या घरी 10.30 वाजता आला होता. त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तो तिथून निघून गेला.
(नक्की वाचा- Swargate Case: ...तर 'ती' वासनेचा बळी झाली नसती! स्वारगेट स्थानकात सुरु होते 'हे' काळे धंदे; वाचा स्फोटक रिपोर्ट)
त्यानंतर पोलिसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाडही त्याठिकाणी आणले. पोलिसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला. त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला. पण गाडे ज्या ठिकाणावरुन आला होता तिथे परतलाच नाही. तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॅालमध्ये झोपून राहिला.
रात्री उशीरा दीड वाजता गुनाट याच गावातील प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि ग्रामस्थ यांना दत्ता गाडे दिसला. यानंतर त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आरोपी आणि ग्रामस्थ यांच्यात झटापट देखील झाली. मात्र ग्रामस्थानी आरोपीला पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
(नक्की वाचा - Pune Shivshahi Crime : पीडितेच्या शरीराचे लचके तोडत राहिला; पहाटे नेमकं काय घडलं? तरुणीच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा)
गावातील रस्त्यावर नाकाबंदी
आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना करण्यात आली. त्याच्या गुनाट या गावी डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला. गावाच्या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो शेतात लपून बसल्याची शक्यता होती. पोलिसांनी येथे संध्याकाळपासूनच ड्रोनद्वारे त्याचा शोध घेतला. गावात ये-जा करण्यासाठी असलेल्या प्रत्येक मार्गावर 24 तास नाकाबंदी सुरू होती. पोलिसांनी बुधवारी रात्री गाडेच्या मित्र-मैत्रिणींसह आई-वडिलांकडेही चौकशी केली.
(नक्की वाचा- Pune News : स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेला 75 तासांनी बेड्या)
पोलिसांसमोर धूम ठोकली
तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसने घरी गेला होता. त्यानंतर त्याने बुधवारी गावातील कीर्तनाला हजेरी लावली. तर दुपारी पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले. त्यावेळी पोलीस आल्याचे पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केले होते. त्याचा मोबाइल बंद असल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या. अशा अनेक अडचणींवर मात करत पोलिसांना आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक केली आहे.