Pune Traffic News: गुगल मॅप्सच्या मदतीने पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार; पोलिसांचे नवे 'स्मार्ट' पाऊल

Pune Traffic News: पुणे पोलिसांनी वाहतूक नियोजनासाठी 'ट्रॅफिक्युअर' सॉफ्टवेअर सुरू केले असून, गुगल मॅप्सच्या मदतीने शहरातील 550 विभागांमधील वाहतुकीचे थेट नियंत्रण केले जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Traffic News: पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. 'ट्रॅफिक्युअर' (Trafficure) या नवीन सॉफ्टवेअर प्रणालीमुळे पोलिसांना शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. या उपक्रमासाठी गुगल मॅप्सची मदत घेण्यात आली असून, यामुळे मनुष्यबळाचा वापर अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

'ट्रॅफिक्युअर' नक्की कसे काम करणार?

ही प्रणाली केवळ माहिती देणारी नसून ती वाहतुकीचे वैज्ञानिक विश्लेषण करणारी आहे. शहरातील कोणत्या रस्त्यावर वाहतूक ठप्प आहे किंवा संथ गतीने सुरू आहे, याची रिअल टाईम माहिती पोलिसांना तत्काळ मिळेल. ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात किंवा जिथे 'बॉटलनेक' (रस्ता अरुंद झाल्यामुळे होणारी कोंडी) तयार होतो, अशा जागा हे सॉफ्टवेअर अचूकपणे शोधून काढेल. गुगल मॅप्सकडून मिळणाऱ्या लाईव्ह डेटाच्या आधारे वाहतूक पोलीस कर्मचारी कोणत्या पॉइंटवर जास्त हवे आहेत, याचे नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांना करता येईल.

(नक्की वाचा-  Ajit Pawar News: अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत सर्वात मोठा खुलासा; काय म्हणाले CM फडणवीस?)

550 विभागांमध्ये शहराची विभागणी

वाहतूक नियंत्रण अधिक सूक्ष्म पातळीवर करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहराचे 550 लहान विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात या प्रणालीची 45 दिवस प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान असे दिसून आले की, शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहनांचा सरासरी वेग सुमारे 26.8 किमी प्रति तास इतका आहे. या चाचणीच्या यशानंतर पुणे पोलीस आयुक्तालयात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले असून, लवकरच याची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी होणार आहे.

(नक्की वाचा-  T20 World Cup 2026: 'विंडिज' विजयामुळे पाँईंटटेबलमध्ये उलटफेर! भारत टेंशनमध्ये; सेमीफायनलची समीकरणे बदलली)

पुणेकरांना काय फायदा होणार?

पुणेकरांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वाहतूक कोंडीत अडकण्याचा वेळ कमी होईल आणि तातडीच्या प्रसंगी पोलिसांना पर्यायी मार्ग सुचवणे सोपे जाईल. "या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपापेक्षा डेटावर आधारित निर्णय घेणे सोपे होणार आहे," असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Advertisement
Topics mentioned in this article