Pune News: पुणेकरांच्या चिंतेत भर टाकणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. वाढीव पाणी वापरापोटी थकीत असलेले तब्बल 932 कोटी रुपये न भरल्यास, पुणे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा राज्य जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला (PMC) दिला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलल्याचा ठपका ठेवत, जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला (PMC) दणका दिला आहे.
वादाचे मुख्य कारण काय?
राज्य शासनाच्या नियमानुसार, पुणे महानगरपालिकेला दरवर्षी 11.60 टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी आहे. मात्र, जलसंपदा विभागाच्या दाव्यानुसार, 2024-25 या वर्षात पालिकेने तब्बल 20.44 टीएमसी पाणी उचलले आहे, जे ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा 8.84 टीएमसी जास्त आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (MWRA) नियमानुसार, कोट्यापेक्षा 125 टक्क्यांहून अधिक पाणी वापरल्यास 3 पट दराने शुल्क आकारले जाते. याच नियमामुळे थकबाकीचा आकडा 952 कोटींवर पोहोचला होता, त्यापैकी पालिकेने केवळ 19 कोटी रुपये भरले आहेत.
(नक्की वाचा- Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
सिंचनासाठी पाण्याचा तुटवडा
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केलं की, "महानगरपालिकेने आपला वर्षाचा कोटा आधीच संपवला आहे. पालिकेच्या या वाढीव वापरामुळे शेतीसाठी (Irrigation) पाणी सोडताना विभागाला मोठ्या अडचणी येत आहेत. जर थकबाकी भरली नाही, तर पाणीपुरवठा कधीही थांबवला जाऊ शकतो."
पुणे महानगरपालिकेची भूमिका
दुसरीकडे, पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचा हा दावा फेटाळून लावला आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि 'फ्लोटिंग' लोकसंख्या पाहता 11.60 टीएमसीचा कोटा अपुरा आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी या पाणी कोट्याच्या दाव्याला आव्हान देण्याचे आदेश दिले असून, या संदर्भात जलसंपदा विभागाला पत्रही पाठवण्यात आले आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पिंपरी-चिंचवडलाही दणका
केवळ पुणेच नाही, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेलाही (PCMC) जलसंपदा विभागाने 122 कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस पाठवली आहे.