Pune News : पुण्यात ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. कानठळ्या बसतील अशा आवाजाने सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: आपले कान झाकून घ्यावे लागले. पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर प्रचंड मोठ्या आवाजात डीजे सुरू होते. ज्यामुळे नागरिक हैराण झाले होते. या गोंधळामुळे शहरातील वाहतूकही विस्कळीत झाली होती. ज्यामुळे पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.
मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे संगीत सर्वत्र ऐकू येत होते. शहरातील वाहतूककोंडीत अडकलेल्या अनेक वाहनचालकांनी आणि नागरिकांनी या आवाजापासून बचाव करण्यासाठी आपले कान बंद केल्याचे दिसून आले.
(नक्की वाचा- USA Tragedy: डंकीने अमेरिकेत गेला, नोकरी मिळवली, पैसे कमवले, पण शेवट असा भयंकर की, घरचे म्हणतात...)
वाहतूक कोंडीमुळे पुण्यात गोंधळ
डीजेच्या दणदणाटासोबतच शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीही झाली होती. छावणी, स्वारगेट, मार्केट यार्ड आणि फातिमानगर यांसारख्या प्रमुख भागांमध्ये वाहतूक पूर्णपणे थांबली होती. यामुळे प्रवाशांना आपलं ठिकाण गाठण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला.
मिरवणुकीमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सण साजरा करणाऱ्यांना आनंद मिळाला असेल, परंतु सर्वसामान्य नागरिकांची यामुळे प्रचंड गैरसोय झाली, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.