- छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन अधिग्रहण व मोबदला देण्याची मुदत ३० जूनपर्यंत
- सद्यस्थितीत १२१६ हेक्टर जमिनी पैकी ८५१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे
- आतापर्यंत या प्रकल्पासाठी ९५० कोटी रुपये वाटप झाले असून पुढील आठवड्यात २००० कोटी रुपये मिळणार आहेत
देवा राखुंडे
छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा (पुरंदर) बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण सुरू आहे. शिवाय मोबदला ही दिला जात आहे. आता या दोन्ही प्रक्रीयांसाठी मुदत वाढ मिळाली अशी मागणी होत आहे. ही मागणी शेतकरी आणि सरपंचांनी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार 30 जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. त्यामुळे आता जमीन अधिग्रहण आणि मोबदला 30 जून पर्यंत घेता येणार आहे. ही प्रक्रीया सध्या सर्वांच्या सहमतीने आणि तेवढ्याच जलदगतीने होत आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, विमानतळासाठी आवश्यक असलेल्या 1 हजार 216 हेक्टर क्षेत्रापैकी 851 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. त्या आधारावर जवळपास 70 टक्के करारनामे ही जमा झाले आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी आता पर्यंत 950 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. 2000 कोटी रुपये पुढच्या आठवड्यात प्राप्त होतील अशी माहिती ही त्यांनी दिली आहे. शिवाय उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण जमीन अधिग्रहण प्रक्रीया लवकरच पूर्ण केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादन करताना काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे मूल्यांकन, न्यायालयीन दावे, महसूल विभागातील प्रकरणे, नाव दुरुस्ती, वारस नोंदी, हक्कसोडपत्र आणि इतर महसुली प्रक्रिया प्रलंबित आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तरी त्यास काहीसा कालावधी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून जमीन अधिग्रहणास सहमती व मोबदला स्वीकारण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे डुडी यांनी स्पष्ट केले.
या मुदतवाढीमुळे प्रलंबित कागदपत्रे आणि महसुली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान या विमानतळाला सुरूवातीला मोठा विरोध शेतकऱ्यांनी केला होता. शिवाय जमीन देणार नाही अशी ही भूमीका घेतली होती. मात्र प्रशासनाने हे प्रकरण अतिशय कौशल्याने हाताळले. मोबदला ही मोठा देण्यात आला. शेवटी शेतकऱ्यांची समजूत काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. त्यामुळे सध्या जमीन अधिग्रहणासोबत मोबदला देण्याची प्रक्रीया सुरू आहे.