- राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन गुरुवारी साजरा झाला, ज्यात पक्षाचे प्रमुख नेते व्यासपीठावर एकत्र आले होते
- प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी भुजबळांना लक्ष्य करत त्यांना शाब्दीक चिमटे काढले
- धनंजय मुंडे यांनी ही छगन भुजबळ यांच्यावर टीका केली
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा वर्धापन दिन आज गुरूवारी पार पडला. या वर्धापन दिनी राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते व्यासपिठावर एकत्र आले होते. गेल्या काही दिवसात राज्यसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होती. त्यात ही तटकरे विरूद्ध भुजबळ असे चित्र रंगले होते. त्याला या वर्धापन दिनी एक वेगळी किनार होती. भुजबळांना राज्यसभेवर जाण्यात अपयश आले. शिवाय पंकज भुजबळ यांना ही मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मी कबड्डीचा खेळाडू आहे बुद्धीबळाचा नाही असं वक्तव्य करत तटकरेंना लक्ष केलं होतं. याचाच धागा पकडत तटकरे, मुंडे आणि भुजबळ यांच्यात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी जुगलबंदी रंगली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी वर्धापन दिनी सुरूवातीलाच जोरदार बॅटींग केली. त्यांचा खरा रोख हा छगन भुजबळांकडे होता. ते म्हणाले भुजबळ हे उत्तम खेळाडू आहेत. तुम्ही कबड्डीचे खेळाडू. एकाचवेळी पाच सात खेळाडू बाद करता असा टोला ही त्यांनी त्यांना लगावला. बोनस गुणांसह खेळाडू घेण्याची ताकद एनसीपीमध्ये आहे असं सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. भुजबळ महापौर झाले. सुधीर भाऊ, मनोहर जोशी झाले नाही. याचाच अर्थ तुम्ही कबड्डी पेक्षा बुद्धीबळ जास्त खेळता. ते तुम्ही जाणता असं म्हणत चिमटा ही काढला. पुढे तटकरे म्हणाले तुमच्या बाजूला फूटबॉल प्लेअर पटेल आहेत, दुसरीकडे कुस्तीपटू हसन मुश्रीफ आहे. अजित दादांनी एक एक चांगले खेळाडू तयार केले आहेत असं सांगायला ते विसरले नाहीत.
तटकरेंनंतर धनंजय मुंडे यांनी माईक सांभाळला. त्यांनी ही तटकरेंच्या पावलावर पाऊल टाकले. ते म्हणाले इथे कबड्डी, खोखो, फुटबॉल, बुद्धीबळाचाही विषय झाला. मात्र खरे खेळाडू हे समोर बसलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. आम्ही कायम बारावे राहणार याची मला जाणीव आहे. पण एक निश्चित आहे. खेळात राजकारण असो किंवा राजकारणात खेळ असो सूर्यकुमार यादव ज्याने वर्ल्ड कप जिंकवून दिला त्याला ही संघा बाहेर राहावे लागले. आणि वयाच्या 15 व्या वर्षातही वैभव सूर्यवंशीला संधी मिळली. याचा अर्थ कर्तृत्वाला, कामाच्या मोजमापाला पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे असं सांगत त्यांनी भुजबळांनाच टोला लगावला. नव्या लोकांना संधी मिळतेच असं त्यांनी भुजबळांना ठासून सांगितलं.
तटकरे मुंडेंनंतर वेळ होती ती भुजबळांची. आपला राजकारणातला अनुभव काय आहे हे भुजबळांनी आपल्या भाषणातून दाखवून दिलं. त्यांनी यावेळी तटकरे आणि मुंडेंची अशी काही फिरकी घेतली ज्याने उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये खसखस पिकली होती. आधी त्यांनी तटकरेंना प्रत्युत्तर दिलं. खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका. पक्ष कसा वाढेल याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आपण काय केलं आहे याचा पाढाच त्यांनी यावेळी वाचला. आपल्याला काँग्रेसकडून त्यावेळी मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती. पण आपण गेलो नाही. पक्षा पेक्षा कुणी मोठा नाही हे सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहीजे असा इशाराच त्यांनी तटकरेंना जणू दिला. त्यानंतर त्यांनी मोर्चा मुंडेंकडे वळवला. ते म्हणाले संधी सर्वांनाच मिळते पण संधीचं सोनं करायचं की माती करायची हे ज्याने त्याने ठरवले पाहीजे असं बोलताच एकच हंशा पिकला. त्यावेळी मुंडेंच्या वर्मी हा घाव लागला. भुजबळांनी एकाच दगडात दोन पक्षी मारत राज्यसभेची संधी हुकल्याचा वचपाच काढल्याची चर्चा रंगली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world