ळअकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजन आणि बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसून आलं. यावरून राजकारण सुरू झालं आहे. मात्र या घटनेचा संबंध आता मनसे-ठाकरे गटाच्या वाढत्या जवळीकीशी जोडला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. या वाढत्या जवळीकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक नवं समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
(नक्की वाचा- India Alliance News: इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? सहाव्या रांगेत स्थान दिल्याने चर्चांना उधाण)
काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता
आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ठाकरे गटाने मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसची कोंडी होऊ शकते. कारण मनसेचे राजकारण प्रामुख्याने मराठी विरुद्ध अमराठीच्या मुद्द्यावर आधारित आहे. मनसेचा ज्यांना विरोध आहे तीच काँग्रेसची एक मोठी व्होट बँक मानली जाते. अशा परिस्थितीत, जर ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली, तर काँग्रेस सोबत राहील याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक येत्या काळात महाविकास आघाडी फुटण्याचे एक प्रमुख कारण ठरू शकते, असे म्हटले जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका बैठकीत राहुल गांधी यांनी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते. या घटनेचा संबंध त्यांच्या बदललेल्या भूमिकेशी जोडला जात आहे. या सर्व घडामोडी पाहता, महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात मोठे बदल दिसून येऊ शकतात.
(नक्की वाचा- Ajit Pawar: पुण्यात आणखी 3 महानगरपालिका? DCM अजित पवारांची मोठी घोषणा)
भाजपची टीका
भारतीय जनता पक्षाने हा फोटो ट्वीट करत स्वाभिमान शोधून दाखवा, असा टोला लगावला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्वीट करत म्हटलं की, "भाजपासोबत होते तेव्हा मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांना किती सन्मान होता. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर जाऊन सन्मान करीत. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते. "
"कट टू २०२५, आता पहा महाविकास आघाडीत आल्यापासून राहूल गांधी, सोनिया गांधी कुणी मातोश्रीवर गेले? उत्तर नाही. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आंदरांजली वाहण्यास कुणी काँग्रेस नेता गेला? उत्तर नाही. मा. बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसने हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला? उत्तर नाही."
"दरवर्षी आता उद्धव ठाकरेच दिल्लीत राहुल सोनिया गांधींना भेटायला जातात. हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली. त्यातून मान गेला, सन्मान गेला हातात पडलं काय तर, आता तर काय बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग…."