
दिल्ली: दिल्लीमध्ये एकीकडे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडीही पाहायला मिळत आहेत. सध्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घरी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी इंडिया आघाडीची बैठकही झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना मागच्या रांगेत बसवण्यात आल्याचे दिसत आहे. ज्यावरुन आता महायुतीने ठाकरेंवर टीका केली आहे.
नेमकं काय घडलं?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह देशभरातील विविध पक्षांच्या प्रमुखांनी हजेरी लावली. यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने केलेल्या मतचोरीचा पुरावा दाखवत इंडियाच्या नेत्यांसमोर प्रेझेंटेशन दाखवले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
LoP Shri @RahulGandhi briefs INDIA alliance leaders on #VoteChori, sharing key insights and evidence.
— Congress (@INCIndia) August 7, 2025
A united front against electoral manipulation!
📍 New Delhi pic.twitter.com/UhJfROz92L
विशेष म्हणजे, अभिनेते कमल हसन यांना उद्धव ठाकरेंच्या पुढे स्थान देण्यात आले. त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सहाव्या रांगेत स्थान दिले. या बैठकीचे फोटो समोर आल्यानंतर आता जोरदार टीका होताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटासह भारतीय जनता पक्षानेही यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाने हा फोटो ट्वीट करत स्वाभिमान शोधून दाखवा, असा टोला लगावला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world