Dombivli News : गर्दीचा आणखी एक बळी; विद्यार्थ्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

रेल्वे प्रवासी संघटनाकडून रेल्वे गाड्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. अपघात थांबवण्यासाठी रेल्वेने त्वरित उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. परंतु रेल्वेकडून अजून यासंदर्भात ठोस पाऊल उचलले जात नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. आयुष दोषी असे या तरुणाचे नाव आहे. गर्दीमुळे ट्रेनमधून पडून प्रवाशाच्या मृत्यूची ही पहिलीच घटना नाही. 

डोंबिवली पश्चिम येथील ठाकूरवाडी परिसरातील मधुकुंज इमारतीमध्ये राहणारा 20 वर्षांचा आयुष मुलुंडमधील एका कॉलेजमध्ये डिप्लोमा करत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी आयुष डोंबिवली रेल्वे स्थानकात पोहोचला. मुंबईकडे जाणारी 8.15 ची लोकल पकडली. डोंबिवली आणि कोपरदरम्यान तो लोकलमधून पडला आणि गंभीर जखमी झाला. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुषच्या मृत्यूनंतर दोषी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(नक्की वाचा- मुंबईत रिक्षा चालक अन् कार चालकामध्ये वाद; भररस्त्यात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू)

यावर्षी डोंबिवलीमधील अनेक प्रवाशांचा गर्दीमुळे ट्रेनमध्ये पडून मृत्यू झाला आहे. काही दिवसापूर्वीच दुबे नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. आता आयुषच्या मृत्यूनंतर डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मृत्यूची घटना घडताच डोंबिवलीतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे हे आयुषच्या घरी पोहोचले. दररोज डोंबिवली आणि मुंब्रादरम्यान दोन अपघात होतात रेल्वे आणखी किती डोंबिवलीकरांचा बळी घेणार, असा सवाल दिपेश म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित केला.

रेल्वे प्रवासी संघटनाकडून रेल्वे गाड्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. अपघात थांबवण्यासाठी रेल्वेने त्वरित उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. परंतु रेल्वेकडून अजून यासंदर्भात ठोस पाऊल उचलले जात नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रेल्वेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात 171, फेब्रुवारी महिन्यात 152, मार्च महिन्यात 165, एप्रिल महिन्यात 179, मे महिन्यात 182, जून महिन्यात 135 तर जुलै महिन्यात 177 प्रवाशांनी जीव गमावला आहे. यात चालत्या लोकल मधून पडल्याने, उतरताना धक्का लागल्याने किंवा पाय घसरून पडल्यामुळे तर कधी रेल्वे ट्रक ओलांडताना मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा-  Pune Crime : बोपदेव अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी ताब्यात, प्रयागराज येथून अटक)

रेल्वेच्या फलाटावर किंवा पादचारी पुलावर वावरणाऱ्या किंवा चालणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूची नोंद देखील या आकडेवारीत घेण्यात आली आहे. दिवसाला किमान 6 प्रवासी अशाप्रकारे जीवाला मुक्त असून ही आकडेवारी थरकाप उडवणारी असल्याचे प्रवाशाचे म्हणणे आहे. हे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या दुर्घटनेत दगावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

Topics mentioned in this article