सध्या मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलीच थंडी पडली आहे. पुण्यात तर सकाळी उशीरापर्यंत रस्त्यांवर धुकं पाहायला मिळतं. दरम्यान नववर्षापूर्वी राज्यातील वातावरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता जरी थंडी असली तरी पुढील दोन दिवसात राज्यातील काही भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नक्की वाचा - पवना धरण परिसरात पुण्यातून फिरायला आलेले दोन पर्यटक बुडाले
पुढील दोन दिवसात 27 डिसेंबरला दुपारपासून ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदूरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल असा अंदाज आहे. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल. ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि याचा परिणाम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळू शकेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. 29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान असू शकेल आणि 30 डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होईल.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलत्या स्थितीनुसार नियोजन करावं, असे आवाहन करण्यात येत आहे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत खांबाजवळ आसरा घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world