BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बोटाला लावल्या जाणाऱ्या 'शाई'पासून ते मतमोजणीच्या 'पाडू' यंत्रापर्यंत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.
राज ठाकरे यांनी मतदारांच्या बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईबाबत मोठा दावा केला आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं की, "आज मतदानासाठी आलो तर नवीनच गोष्ट पाहिली. आजपर्यंत बोटाला शाई लावली जात असे. मात्र आज बोटाला मार्करने खूण केली जात आहे. ही शाई सॅनिटायझर लावले की लगेच निघून जाते. म्हणजे शाई लावा पुसा आणि पुन्हा मतदान करा असं करायचं आहे का?"
(नक्की वाचा- BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उशिरा लागणार? उमेदवारांची धाकधूक वाढली)
'पाडू' यंत्र घणाघात
मतमोजणीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या PADU (Printing Auxiliary Display Unit) यंत्रावरून राज ठाकरेंनी सरकारला घेरले आहे. निवडणूक आयोग पाडू नावाचं यंत्र मतमोजणीच्या वेळी वापरणार आहेत, पण ते कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेले नाही. पत्र पाठवूनही त्याबद्दल निवडणूक आयोग स्पष्टता का देत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
निवडणुका जिंकण्यासाठी सरकार वाटेत ते करतंय
सरकार कशाप्रकारची यंत्रणा चालवली जात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी वाटेत ते सरकार करत आहे. आधी दुबार मतदार, नंतर व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नाही. ज्यामुळे आपलं मत कुणाला गेलं हे दाखवण्याचा मार्गच उरत नाही. आता पाडू नावाचं यंत्र मतमोजणीच्या वेळी वापरलं जाणार आहे. विरोधकांनी, दुसऱ्या पक्षांनी निवडणुका लढायच्या की नाही. निवडणुका कशा जिंकायच्या हे सरकारने ठरवायचं. विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी जे केलं तसंच करायचा प्रयत्न करत आहे, मात्र तसं होणार नाही हा विषय वेगळा आहे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- VIDEO : चेंबूरमध्ये बनावट अधिकारी अन् पैसे वाटपावरून राडा; ठाकरे गट आक्रमक, उमेदवारही भावुक)
याला सत्ता म्हणत नाही
संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलं आहे. आम्ही आमच्या परीने जे करायचं ते करत आहोत. अशा निवडणुका लोकशाहीची लक्षणे नाहीत. अशा निवडणुका लढून सत्तेवेर येणे याला सत्ता म्हणत नाही. सत्तेचा किती गैरवापर करावा, यालाही काही मर्यादा असायला हव्यात. शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांना सतर्क राहण्याचा आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं.