Raj Thackeray PC: मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली होती. या भेटीचे विविध राजकीय अर्थ काढले जात होते. मात्र या भेटीत राजकीय नाहीतर मुंबईतील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि शहराच्या सुनियोजित विकासावर चर्चा झाल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शहरातील पायाभूत समस्यांवर एक प्रेझेंटेशन दिले. त्यांनी मागील काही महिन्यांपासून शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या प्रश्नांवर एक आराखडा तयार केला होता. हा आराखडा कसा असेल, याबाबत मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. टाऊन प्लॅनिंग' हा माझ्या आवडीचा विषय आहे. तुमच्याकडे ट्रॅफिकची परिस्थिती कशी आहे हे दाखवा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो, असं म्हणत मुंबईतील वाहतुकीची समस्या राज ठाकरे यांनी अधोरेखीत केली.
राज्यातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकास होत असताना अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. जिथे आज 50 लोक राहत होते, तिथे 500 लोक राहत आहेत. त्यामुळे माणसे आणि वाहने वाढली असून, सगळ्या गोष्टी रस्त्यावर आल्या आहेत. रस्ते कमी आहेत, वाहतुकीला शिस्त नाही आणि लोक कुठेही गाड्या पार्क करत आहेत. यावर आताच काम केले नाही, तर भविष्यात मोठी अडचण होईल, अशी भीती देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
कबूतर, हत्तीत अडकल्याने मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “आपण कबूतर, हत्ती यांसारख्या विषयांमध्ये अडकल्यामुळे मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र सध्या आपल्या शहरांत पार्किंगला शिस्त लावण्याची तातडीची गरज आहे. डबल पार्किंग आणि 'नो पार्किंग'चा विषय वाढत आहे. यावर तोडगा म्हणून त्यांनी ‘स्मार्ट पार्किंग'चा उपाय राज ठाकरे यांनी सुचवला. छोटी छोटी जी मैदाने आहेत, तिथे गाड्यांचे पार्किंग होऊ शकते. अशी टेक्नॉलॉजी जगभर उपलब्ध आहे. मुलांसाठी असलेली मैदाने सुरक्षित राहतील आणि पार्किंगची समस्याही सुटेल, असेही त्यांनी सूचवलं.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, जिथे पार्किंग करायचे आहे आणि जिथे करायचे नाही, त्या फुटपाथला विशिष्ट रंग द्यावा, जेणेकरून लोकांना स्पष्टपणे समजेल. वाहतुकीच्या नियमांबाबतचा बेशिस्तपणा वाढत आहे, ज्यामुळे शहराची शिस्त बिघडेल. हा बेशिस्तपणा पुढे इतरही गोष्टींमध्ये दिसून येईल. शहरांचा आराखडा आताच आखणे आवश्यक आहे, अन्यथा काही वर्षांनी ही परिस्थिती हाताबाहेर जाईल.