Raj Thackeray on Sharad Pawar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज ठाकरे यांनी आजवर अनेक सभांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र, या मेळाव्यात राज ठाकरे यांनी चक्क शरद पवार यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले. महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगात मोठे करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या यादीत राज यांनी शरद पवारांचे नाव आदराने घेतले असून, त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव केला आहे.
ऐतिहासिक महापुरुषांच्या यादीत पवारांचा उल्लेख
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तींचे स्मरण केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, सर्व संत आणि थोर समाजसुधारकांपासून ते प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावांचा समावेश होता. याच ऐतिहासिक नावांच्या मांदियाळीत राज यांनी शरद पवार यांचेही नाव घेतले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ज्या गोष्टी योग्य आहेत, त्याचे कौतुक झालेच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी यावेळी मांडली.
( नक्की वाचा : Raj Thackeray:' 'आधी इन्स्टाग्राममधून बाहेर पडा!"; राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत असं का सांगितलं?)
फलोत्पादन क्षेत्रातील क्रांतीचे श्रेय
शरद पवार यांच्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज आपण रस्त्यावर जी विविध प्रकारची फळे पाहतो, जी पूर्वी कधीही पाहायला मिळत नव्हती, ती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात पवारांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात फलोत्पादन क्षेत्रात सर्वात मोठी क्रांती शरद पवार यांनी केली आहे. अनेक फळे पूर्वी कधीच महाराष्ट्रात दिसत नव्हती, पण आज ती सर्वत्र मिळतात, याचे संपूर्ण श्रेय राज यांनी पवारांना दिले. राजकीय मतभेद कितीही असले तरी या कार्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर
राज ठाकरे यांनी बारामतीमधील शेतीच्या प्रयोगांचाही विशेष उल्लेख केला. शरद पवार यांनी बारामतीमध्ये शेती क्षेत्रात एआय (AI) म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणून मोठी क्रांती केली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतीचा चेहरामोहरा बदलला असून, सर्वांनी एकदा बारामतीला जाऊन हे प्रयोग नक्की पाहावेत, असे आवाहनही राज यांनी आपल्या भाषणातून केले. तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती कशी आधुनिक करता येते, याचे उत्तम उदाहरण पवारांनी सेट केल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
राज ठाकरे यांचे हे भाषण सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. नेहमी टीकेची झोड उठवणाऱ्या राज यांनी अचानक पवारांच्या विकासकामांचे कौतुक केल्याने याचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. आता त्यांनी केलेल्या प्रशंसेला शरद पवार काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world