इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्या व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाशी मुकाबला करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राजकोट (Rajkot fort rada) किल्ल्यावर आज महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष भिडले. हे दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून येत आहे.
मालवणातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकार्पणाच्या आठ महिन्यात कोसळला. या घटनेवरुन महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी मविआचे काही कार्यकर्ते राजकोट किल्ल्यावर गेले होते. वैभव नाईक, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेतेमंडळींना तेथे अडविण्यात आलं. सुरुवातील नारायण राणेंनी मविआच्या नेत्यांना आत येण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काही वेळाने दोघांच्या वेळांमध्ये चुकामुक झाल्याचं सांगण्यात आलं. यावेळी दोन्ही गट एकाच वेळी आल्याने शिवाजी महाराजांच्या पवित्र ठिकाणी मविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.
झेंडा फाटेपर्यंत महिलेला धक्काबुक्की...
राजकोटमधील या राड्या दोन्ही गटातील महिला नेत्यांचाही समावेश होता. ठाकरे गटाच्या महिला नेत्या मशालीचं चिन्ह असलेला भगवा झेंडा घेऊन आल्या होत्या. या झेंड्यावरून दोन्ही गटातील महिलांमध्ये धक्काबुक्की झाली. एकीकडे ठाकरे गटाची कार्यकर्ती महिला झेंडा सोडण्यास तयार नव्हती. सर, मी झेंडो सोडूक नाय पण माका तुडवलय असं म्हणत महिलेने शेवटपर्यंत झेंडा सोडला नाही. दुसरीकडे भाजपच्या महिला नेत्या तो झेंडा ओढून घेण्यासाठी जोर लावत होत्या. शेवटी त्या झेंड्यांच्या चिंध्या चिंध्या झाल्या. महाराजांच्या किल्ल्यावर कोणालाही येण्याचा अधिकार आहे, अशी भावना वैभव नाईक यांनी व्यक्त केली. आम्ही कायदेशीर वेळ घेतली होती. मात्र आम्हाला अडवण्यात आलं.
शेवटी मविआचे नेते परतले...
तब्बल दोन तास दोन्ही गटांमध्ये राडा सुरू होता. एकमेकांना शिव्या दिल्या जात होत्या. धक्काबुक्की सुरू होती. पोलीस यंत्रणा दोन्ही गटाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र कोणीच ऐकण्याच्या तयारीत नव्हते. आदित्य ठाकरे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नितेश राणे आपल्या समर्थकांसोबत उभे होते. तब्बल दोन तासांनंतर मविआचे नेते घोषणाबाजी करीत निघून गेले. महारांजांच्या पवित्र स्थळी राजकारण नको म्हणून जात असल्याचं मविआ नेते सांगून गेले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world